पुणे (वृत्तसंस्था) – नेवासे फाटा, श्रीरामपूर ते नेवासा दरम्यान रस्त्यावर अनेकांना कट मारुन भरधाव वेगाने पळून जाणाऱ्या मालट्रकचा नेवासा पोलीस व पत्रकारांनी थरारक पाठलाग करून त्या ट्रकला शेवगावमध्ये पकडले. हा ट्रक कोपरगाव येथून नांदेडकडे देशी दारू घेऊन चालला होता. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपुरहून नेवासाकडे मालट्रक (क्रमांक एम एच 44 /9411) भरधाव वेगात येत असल्याची सूचना नेवासातील पत्रकारांना मिळाली.
तत्पूर्वी या ट्रकने श्रीरामपूरकडे जात असलेल्या शिवनेरी ट्रान्सपोर्टच्या शिवनेरी बसला समोरासमोर कट मारला. यात बसचे मोठे नुकसान झाले. तसेच श्रीरामपूर येथील बंटी आछडा यांच्या मालकीच्या ट्रकला नेवासा बुद्रुक येथे मेन रस्त्यावर समोरासमोर धडक दिली. त्यात ट्रकचे नुकसान झाले असून ट्रक चालक रीजवान शेख जखमी झाला. त्यानंतर नेवासा पोलीस व पत्रकारांनी नेवासा शहरात हा ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन पत्रकारांनाही कट मारून ट्रक चालकाने पलायन केले.
नेवासा बाजार समितीकडून खडका फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याने जाऊन हा ट्रक भरधाव वेगाने नेवासा फाट्याकडे आला. नेवासा फाट्याकडून भेंड्याकडे जात असताना पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी भेंडा ग्रामस्थांना सूचना दिली. त्यानुसार भेंडा पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर अडथळे निर्माण करण्यात आले. परंतु हे अडथळे तोडून ट्रक भरधाव वेगाने निघून गेला. दरम्यान या ट्रकचा पुढचा टायर फुटला, तरीसुद्धा चालकाने केवळ डिस्कवर ट्रक चालवत नेला.
कुकाणा येथेही पोलीस व ग्रामस्थांनी बॅरेकेटींग लावून व रस्त्यावर लाकडे टाकून अडथळे निर्माण केली. तीही तोडून ट्रकने पलायन केले. कुकाणा सोडल्यानंतर मात्र सदर ट्रक शेवगावकडे जाणार हे ओळखुन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचेशी संपर्क साधून शेवगाव बसस्टॅंड जवळ जिल्हा बॅंकेसमोर बॅरेकेटिंग लावण्यात आले असता या ट्रक चालकाने हे अडथळे तोडून पळून जात असताना टर्न न बसल्याने हा देशी दारूचे बॉक्स भरलेला ट्रक शेवगाव वाचनालयाचे प्रवेशव्दाराशेजारी असलेल्या शिवनेरी व आशिया मोबाईल शॉपीमध्ये घुसला. जखमी चालकास शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, नेवासाचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे व शेवंगावचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या उपस्थितीत ट्रकची पाहणी केली असता, त्यात देशी दारूचे 700 ते 800 बॉक्स असल्याचे समजते. पाठलाग करणयात पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, पो. कॉ. संभाजी गर्जे, मोहन गायकवाड, अंबादास गिते, जयवंत तोडमल, अशोक कुदळे, पत्रकार शंकर नाबदे, पवन गरुड, सुखदेव फुलारी, सुनील गर्जे, सोपान महापूर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.