भुसावळ शहरातील घोडे पीर बाबा रस्त्यावरील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – येथील घोडेपीर बाबा रोडवरील मोरया हॉल मागील रहिवासी भारत सुरेंद्र शर्मा (वय २४) या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता घडली. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत भारतला दोन बहिणी असून पैकी एक विवाहित आहे. भारत आणि त्याचे वडील हे इलेक्ट्रिकची कामे करतात. गुरुवारी सकाळी तो मोरया मंगल कार्यालयासमोर एका टपरीत वायरिंगचे काम करत होता. सकाळी ११ वाजता शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय, मित्रांनी घटनास्थळ गाठले. भारतचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तिथे शवविच्छेदन करण्यात आले होते. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली. दरम्यान, गुरुवारी घडलेल्या या दुदैवी दुर्घटनेत शर्मा यांच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने शर्मा परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.