जळगाव तालुक्यात घडली घटना ; रावेर तालुक्यात शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) :- नाशिकला कामानिमित्त आल्यावर तेथे मन रमले नाही. अखेर गावाकडेच जाऊ म्हणून मुलाने आईला घरी नेण्याचे ठरविले. भुसावळला उतरण्यासाठी गीतांजली एक्स्प्रेस या रेल्वेगाडीत नाशिकहून बसले. मात्र बाथरूमला गेलेला मुलगा अचानक गाडीतून खाली पडला व गंभीर मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना शुक्रवारी दि. ६ जून रोजी ५ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यात तरसोदजवळच्या रेल्वेरुळाजवळ घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
आनंद अशोक रजाने (वय ३३, रा. निंभोरा ता. रावेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, २ बहिणी यांच्यासह राहत होता. हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. (केसीएन)दरम्यान, आनंदची आई सखुबाई रजाने ह्या नाशिक येथे उदरनिर्वाहाकरिता गेल्या होत्या. मात्र, नाशिकला नको आपल्या गावाकडेच काम करू असे म्हणून आनंद याने आईला घरी नेण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दुपारी गीतांजली एक्स्प्रेसने ते नाशिकहून भुसावळ जाण्यासाठी निघाले. दरम्यान, जळगाव स्टेशन गेल्यावर आनंद हा बाथरूमला गेला होता. अचानक, कोणीतरी गाडीतून पडला म्हणून लोकांनी आवाज दिला.तेव्हा सखुबाई यांना, आनंद रेल्वेतून पडल्याचे समजले.
त्यांना काहीच सुचले नाही. रेल्वेगाडीतील नागरिकांनी त्यांना धीर देऊन भुसावळ स्टेशनवरून जळगाव येथे जाण्यासाठी सांगितले. तोवर जळगाव तालुका पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. सखुबाई रजाने यांनी मुलगा आनंद असल्याची माहिती देऊन व तो मयत झाल्याची माहिती मिळताच एकच आक्रोश केला.(केसीएन)या घटनेमुळे पोलिसही स्तब्ध झाले होते.मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आला आहे. घटनेची जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.