अमळनेर पोलिसांची पैलाड भागात कारवाई
अमळनेर ( प्रतिनिधी ) – बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजी नगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील २० हजार ५०० रुपये किमतीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी दि. ५ जून रोजी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की, क्रीडा संकुलाच्या भिंतीआड एक जण बेकायदेशीर पिस्टल बाळगून आहे. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, निलेश मोरे, विनोद संदानशिव, सिद्धांत शिसोदे याना बोलावून पिस्टल बाळगणाऱ्या इसमाला पकडण्याचे आदेश दिले. पोलिसांनी साडे सात वाजेच्या सुमारास शोध घेण्याचा प्रयत्न केला असता क्रीडा संकुलाच्या भिंतीआड एक तरुण पोलिसांना पाहून पळू लागला.
त्याला पकडून त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ सिंगल बोअरचे पिस्टल व जिवंत काडतुस आढळून आले. त्याचे नाव चेतन उर्फ सत्तू किरण धोबी (वय १९, रा. शिवाजीनगर, पैलाड)असे समजले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यजवळून २० हजारचे पिस्टल आणि ५०० रुपयांचे काडतुस जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध शस्र कायदा ३,५ आणि मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.