चाळीसगाव तालुक्यात पोहरे गावामध्ये शेतकरी विद्युत समस्यांनी हैराण
महेश पाटील
चाळीसगाव :- गेल्या आठवड्यात चाळीसगाव तालुक्यातील पोहरे गावात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. वादळामुळे विद्युत वाहक तारा शेतात लोंबकळत पडल्या असून, यामुळे गावाचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. परिणामी, शेतकरी भयभीत झाले असून त्यांच्या शेतीकामांना मोठा फटका बसला आहे. “केसरीराज” शी बोलताना शेतकऱ्यांनी त्यांची आपबिती कथन केली आहे. तारा आणि ट्रान्सफॉर्मर शिल्लक नसल्याचे कारण देत नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात आहे.
गावातील शेतकरी प्रवीण माळी यांनी लावलेली गवार पाण्याअभावी सुकत आहे. तसेच, ठिबक सिंचनाद्वारे कपाशी लागवडीची तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांची विजेअभावी चिंता वाढली आहे. पोहरे गावातील सुमारे ८० शेतकऱ्यांचे शेतीपंप विजेअभावी बंद आहेत.(केएसएन)वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वीज वितरण कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र (डीपी) आणि खांब्यासाठी वर्गणी करून पैसे जमा करण्यास सांगितले आहे. त्यानंतरच वीजपुरवठा सुरू करता येईल असे म्हटले आहे. गट ४०३ मधून या तारा शेतात लोंबकळत पडल्या आहेत.
या विद्युत वाहक तारांना स्पर्श होऊन २ मेंढ्या दगावल्या आहेत. तर १ तरुण बांधावरून जात असतांना विजवाहक तारेचा हलका धक्का लागला. त्याच्या पायात बूट होते म्हणून सुदैवाने तॊ वाचला. दगावलेल्या मेंढ्यांचा शासनाने केलेला सदर पंचनामा चुकीचा केलाय असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, तारा आणि ट्रान्सफॉर्मर शिल्लक नसल्याचे कारण देत नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात आहे.(केएसएन)पोहरे सबस्टेशनचे विद्युत वितरण कर्मचारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावातील शेतकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने आणि वीज वितरण अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष घालून तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी पोहरे ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच, तालुक्याचे कर्तव्यदक्ष आ. मंगेश चव्हाण यांनीही या प्रकरणात लक्ष घालून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.