जळगाव तालुक्यात नशिराबाद येथील महामार्गावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील नशिराबादजवळ रिक्षाचे पुढील चाकाचे एक्सेल तुटल्याने झालेल्या भीषण अपघातात १ तरुण ठार तर २ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी दि. ४ रोजी सकाळी घडली. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते. तरुणाच्या मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच आक्रोश केला.
वसीम खान ईस्माईल खान (वय २८, रा. शिवाजी नगर, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुले, २ भाऊ असा परिवार आहे. जळगाव येथील एमआयडीसीत काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)बुधवारी नेहमीप्रमाणे सकाळी वसीम हा जेवणाचा डबा घेऊन भुसावळ येथून जळगाव जाण्यासाठी एका रिक्षात बसला. भुसावळकडून जळगावच्या दिशेने प्रवासी घेऊन येणारी हि ऑटो रिक्षा (क्रमांक एमएच.१९. बीजे ५४३१) नशिराबाद शहराकडे जाणाऱ्या समांतर रस्त्यावर आली असता अचानक रिक्षाचे पुढील चाकाचे एक्सेल तुटल्याने व त्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली.
यात रिक्षा पलटी झाली. तर वसीम खान हा रस्त्यावर पडून त्याला जबर मार लागून तो गंभीर जखमी झाला.त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर इतर २ प्रवासी जखमी झाले.(केसीएन)त्यांना नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. वसीम खान याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. अपघातानंतर महामागनि ये-जा करणाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केली. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.