रावेर तालुक्यात सावदा – अंकलेश्वर महामार्गावरील घटना
रावेर (प्रतिनिधी) – रावेर येथून लग्न सोहळा आटोपून घरी परतणाऱ्या दोन तरुणांचा सावदा – बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. वाघोदा बुद्रुक ते रावेर दरम्यान एका आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर ताब्यात घेण्यात सावदा पोलिसांना यश आले आहे.
सावदा येथून केळी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकने (क्रमांक नमूद नाही) मोठा वाघोदा गावापुढील पेट्रोल पंपाजवळ, एका एस वळणावर रणगाव, ता. रावेर येथील दुचाकीस्वार नितीन धनराज कोळी (वय ४०) आणि नितीन रामलाल कोळी (वय ४०) यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हे दोन्ही तरुण रावेर येथून एका लग्न सोहळ्याहून आपल्या घरी रणगावकडे परत येत होते.अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
मात्र, सावदा पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील तपासणी नाक्यावर त्या आयशर ट्रकला पकडले. पोलिसांनी ट्रक आणि चालकाला सावदा पोलीस ठाण्यात आणले आहे. मृतांचे शवविच्छेदन रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रणगाव परिसरात शोककळा पसरली आहे. दोन तरुणांच्या अकाली निधनाने गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. सावदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश बावस्कर आणि इतर कर्मचारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.