अमळनेर तालुक्यातील निम येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात आई-वडिलांची नजर चुकवून तापी नदीत पोहण्यास गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. दोघांपैकी एकाचा मृतदेह त्याच दिवशी रात्री तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह मंगळवारी सकाळी सापडला.
नीम येथील रहिवासी असलेले चेतन धनराज पवार (वय ९), मयुर उर्फ हरीश बाळू पाटील (वय१२) हे दोघे शाळेला उन्हाळी सुटी असल्याने नेहमी प्रमाणे सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास गावालगतच्या तापी नदीवर पोहण्यास गेले होते.(केसीएन)मात्र, दुपारी चार वाजले तरी दोघे घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. नदीत पोहण्यासाठी उतरण्यापूर्वी त्यांनी अंगातील कपडे काठावर दगडांखाली ठेवले होते. सायंकाळी सहाला गावातील गुराखी नदीवर जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेल्यावर त्यांना तिथे दगडाखालील कपडे दिसून आले.
त्यामुळे नीम गावात ते कपडे कोणत्या मुलांचे आहेत म्हणून चर्चा झाली. हरीश आणि चेतन यांचे नातेवाईक त्यांना शोधत होतेच. त्यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही मुलांचे कपडे ओळखले. त्यानंतर दोघेही तापीच्या पाण्यात बुडाल्याची शक्यता गृहीत धरून त्यांचे मृतदेह शोधण्यास सुरूवात झाली.(केसीएन)अधिक शोध घेतला असता चेतनचा मृतदेह काठावर सापडला. त्याचे शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तर दुसरा मृतदेह सकाळी सापडला आहे. मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, फिरोज बागवान, संजय पाटील, अगोने यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहे.
मयूर उर्फ हरीशचे वडील शेतमजूर आहेत. त्याला एक बहीण आहे. तर चेतनचे वडील मयत झाले असून तो आपल्या आजोबांकडे राहत होता. त्याला एक बहीण आहे. दोन्ही कुटुंबातील वारस गेल्याने संपूर्ण गावाने हळहळ व्यक्त केली जात आहे.