चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे चारित्र्याच्या संशयावरून घडली घटना
“माझ्या मुलांची काळजी घे” भावाला फोन करून तरुणाने केले भयानक कृत्य..!
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील हातगाव येथे चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्यानतंर पतीनेही गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज दि.०२ जून रोजी दुपारी बारा वाजता उघडकीस आली आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला महिलेच्या खून प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्षा विजय चव्हाणके (वय ३८) असे मयत पत्नीचे नाव आहे. त्या पती विजय चव्हाणके (वय ४५), १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होते. (केसीएन) दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विजय हा पत्नी वर्षाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत होता. सोमवारी दि. २ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास वाद झाला. या वादातून पुन्हा चारित्र्यावर संशय घेत विजय याने त्याची पत्नी वर्षा हिचा दोरीने गळा आवळून खून केला. यानंतर त्याने त्याचा भाऊ अशोक याला फोन करून पत्नीचा खून केल्याची माहिती देऊन मुलांकडे लक्ष ठेव असे सांगितले.
यामुळे भाऊ अशोक चव्हाणके हा विजय याच्या शेतातील घराकडे धावला. मात्र त्याआधीच विजय चव्हाणके याने दोरीने छताला गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवन संपवले होते.(केसीएन)या घटनेमुळे भाऊ हादरला. त्याने पोलीस पाटलांना व ग्रामस्थांना माहिती दिली. यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून माहिती जाणून घेतली.
या घटनेमुळे हातगाव गावामध्ये प्रचंड खळबळ उडाली असून चाळीसगाव तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अशोक सुखदेव चव्हाणके यांच्या फिर्यादीवरून त्यांचा भाऊ विजय सुखदेव चव्हाणके याच्याविरुद्ध पत्नीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार हे तपास करीत आहेत.