जिल्हा परिषदेतर्फे माहिती ; अधिकाऱ्यांचे ‘हर घर जल’ ध्येय
जळगाव (प्रतिनिधी) – जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत मंजूर झालेल्या १ हजार ३७१ प्रकल्पांपैकी ४३४ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील अनेक गावांना आणि वाड्यावस्त्यांना स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा सुरू झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी हे प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने त्वेळोवेळी स्थानिक पातळीवरील प्रशासन, अभियंते व ठेकेदार यांच्यासोबत नियमित बैठक घेऊन कामांच्या गतीस चालना दिली.
या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त भागांना दिलासा मिळाला आहे. महिलांना व नागरिकांना पाण्यासाठी दररोज होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळाली असून ग्रामीण भागात जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत उर्वरित प्रकल्पांचे काम देखील गतीने सुरू असून, लवकरच संपूर्ण जिल्हा ‘हर घर जल’ या ध्येयाच्या दिशेने आगेकूच करेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.