म्हसावद-बोरनार जिल्हा परिषद गटातील ‘पद्मालय’ महिला प्रभाग संघाची सर्व साधारण सभा उत्साहात
जळगाव ( प्रतिनिधी ) – बचत गटातील प्रत्येक महिला ही आपल्या घराची ‘अर्थमंत्री’ आहे. बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसायांना चालना द्या. प्रत्येक व्यवहार पारदर्शक ठेवा, ऑडिट वेळेवर सादर करा, आणि व्यवसायात विश्वासार्हता जपा. “लखपती दीदी होण्यासाठी फक्त कर्ज नको, तर कल्पकता ठेवा. “बचत गट म्हणजे छोटा संसार, पण यात लपलाय मोठा व्यापार असे सांगून “तुमचा व्यवसाय तुम्हीच ठरवा, उत्पादनात नाविन्यता आणा, आणि मार्केटिंग शिका. दर्जेदार उत्पादन द्या, ग्राहकाच्या मनात विश्वास निर्माण करा. असा मौलिक सल्ला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बचत गटांच्या महिलांना दिला.
म्हसावद-बोरनार जिल्हा परिषद गटातील ‘पद्मालय’ महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांना संबोधित केले. ते पुढे म्हणाले की, बचत गट म्हणजे गावाचा कणा असून आईनंतर सर्वात जास्त काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे आपली लाडकी बहीण !” मंत्री गुलाबराव पाटील यांनी बहिणीच्या मायेला साद घालत कार्यक्रमात भावनिकतेची लहर पसरवली. महिला बचत गटांसाठी म्हसावद येथे १ कोटींचा ‘ बहिणाई मार्ट’ उभारण्यात येणार असून, लवकरच त्याचे भूमिपूजन करणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते ८७ लाखांचे चेक वाटप
वसंत वाडी, वडली, विटनेर, वावडदा, बिलवाडी, पाथरी कुऱ्हाडदे, बिलाखेदा वराड बु. डोमगाव येथील बचत गटांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वयम् सहायता समूह निधी व समुदाय गुंतवणूक निधी चे ८७ लाखाचे चेक वाटप करण्यात आले.
जबाबदारी घ्या आणि व्यवसाय वाढवा – सी.ई.ओ. मीनल अग्रवाल
“महिला संधीचं सोनं करतात. मंत्री गुलाबराव पाटलांच्या संकल्पनेतून उभा राहत असलेला ‘बहिणाई मार्ट’ संपूर्ण जिल्ह्यांसाठी आदर्श ठरणार असून बचत गट महिलांनी लखपती दीदी बनण्यासाठी जबाबदारी घ्या आणि व्यवसाय वाढवा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले. जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा प्रकल्प संचालक राजू लोखंडे, गट विकास अधिकारी श्वेता पालवे, माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, उपजिल्हा प्रमुख रवी कापडणे, जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्र्वर भोई, सरपंच अनिल पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, समाधान पाटील, बचत गट अधिकारी रवींद्र सुरवंशी, शितल चिंचोरे, सचिन पाटील, संदीप सुरळकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने महिला बचत गटांच्या महीला सदस्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग संघ अध्यक्ष मनीषा पाटील व मालुताई पाटील यांनी केले. प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक रवींद्र सूर्यवंशी यांनी केले तर आभार विजया पाटील व संगीता पाटील यांनी मानले. यावेळी सर्वसाधारण सभेचा लेखा – जोखा प्रभाग संघ लेखापाल प्रतिभा पाटील यांनी सविस्तर मांडला. आशा पाटील, हिराबाई गोपाळ, सोनाली पाटील, पल्लवी जाधव, वंदना पाटील यांनी बचत गटाचे अनुभव कथन केले.