यावल तालुक्यातील अंजाळे येथील घटना
यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील अंजाळे गावाजवळ भुसावळकडून यावलकडे येतांना अंजाळे बस स्थानकाच्या अलीकडील चढावावर गुरुवारी सकाळी खडी घेवुन जाणारे ट्रक्टर अनियंत्रीत होत दरीत कोसळले होते. यात चालक ट्रॅक्टरखाली दबला जावून गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर भुसावळ येथे खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी चालकाचा मृत्यू झाला.
छगन गोमा सपकाळे (वय ४५, रा.कठोरा, ता.यावल) असे मयत इसमाचे नाव आहे. छगन सपकाळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. भुसावळकडून यावलकडे गुरुवारी सकाळी ट्रॅक्टर (क्रमांक एम. एच. १९ सी. जे. १२४७) यामध्ये खडी भरून ट्रॅक्टर चालक छगन गोमा सपकाळे हे येत होते. अंजाळे गावाजवळ मोर नदीच्या पुढे अंजाळे गावाच्या बसस्थानकावर येत असताना चढाव आहे. या चढावावर अचानक समोरून एक वाहन आल्यामुळे ट्रॅक्टर चालकाने आपली गती कमी केली. गती कमी केल्यामुळे ट्रॅक्टर अनियंत्रित झाले. चढावावरून ते मागच्या दिशेने रिव्हर्स झाले. त्यावर नियंत्रण मिळवण्या आधीच ट्रॅक्टर ट्रॉलीसह थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळले. या अपघातात ट्रक्टर चालक सपकाळे हे ट्रॅक्टर खाली दाबले गेले.
गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन तब्बल तीन तासानंतर या ट्रॅक्टरच्या धुडला बाजूला उचलून चालक छगन सपकाळे यांना तिथून बाहेर काढून भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारर्थ दाखल केले होते. दरम्यान शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अंजाळे गावामध्ये शोककळा पसरली आहे.