महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय बैठकीला उत्साहात सुरुवात
शहादा (प्रतिनिधी) :- अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम पुढे येण्यासाठी डॉ. दाभोलकरांनी स्वतः पासून खूप मोठा त्याग केला. त्या त्यागातूनच साडेतीन दशके संघटना उभी राहिली व आजही निरंतर चालत आहे. कार्यकर्ते पोटतिडकिने महाराष्ट्रभर हे ऐतिहासिक व क्रांतिकारी कार्य करीत आहे, असे प्रतिपादन पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे समन्वयक सचिव मकरंद भाई पाटील यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तीन दिवसीय विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक शहादा येथील पूज्य साने गुरुजी वरिष्ठ महाविद्यालय लोणखेडा येथे आयोजित करण्यात आली आहे. उद्घाटन सरी गावचे डाकीण पीडित महिला सेविबाई वसावे यांच्या हस्ते करण्यात आले. मंचावर संस्थेचे समन्वयक सचिव मकरंद पाटील, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शशांक कुलकर्णी, शहादा शाखेचे अध्यक्ष डॉ. बी. डी. पटेल, राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, चारही प्रधान सचिव संजय बनसोडे, डॉ. ठकसेन गोराणे, नंदकिशोर तळाशीलकर, गजेंद्र सुरकार, डाकीण पीडित महिला फोतीबाई वसावे, बोंडीबाई राऊत,राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत वळवी आदी मंचावर उपस्थित होते.
सुरुवातीला शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर आणि पहलगाम येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर “डाकीण ठरवण्यात आलेल्या महिलेचे छळ, शोषण करणाऱ्या बाबीतून सोडवणूक” अशा अनोख्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. डाकीण पीडित महिलेची समिती विविध शोषणातून मुक्तता करणार असा संदेश यातून देण्यात आला. प्रस्तावनेतून जिल्हा कार्याध्यक्ष वसंत वळवी यांनी बैठकीच्या आयोजनाबाबत माहिती सांगितली.
यानंतर डॉ. शशांक कुलकर्णी, संजय बनसोडे यांनी मनोगत केले तर राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी, चांगले काम करीत असल्याबद्दल नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे कौतुक केले. शिक्षणाअभावी भय, अज्ञान जन्माला येते. त्यामुळे अनेक अंधश्रद्धा वाढीस लागतात. त्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती उत्कृष्टपणे काम करीत आहे असे प्रतिपादन मकरंद पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.
सूत्रसंचालन हंसराज महाले यांनी केले. तर आभार डॉ. बी.डी. पटेल यांनी मानले. शहादा येथे शुक्रवार दि. ३०, ३१ मे तसेच १ जूनपर्यंत राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न होत आहे. ३ दिवसांमध्ये जिल्हा अहवाल सादरीकरण त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे पुरस्कार वितरण जेष्ठ समाजवादी कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते तसेच ३ वर्षाची राज्य कार्यकारिणी निवड जाहीर केली जाणार आहे. शनिवारी संध्याकाळी ७ वाजता “संत परंपरा : अंधश्रद्धा निर्मूलन ते मानवता धर्म” या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात पंढरपूर येथील संत साहित्य अभ्यासक ज्ञानेश्वर बंडगर महाराज, बीड येथील कीर्तनकार शामसुंदर सोन्नर महाराज हे वक्ते आहेत. तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधी विचार अभ्यासक प्रा. डॉ. विश्वासराव पाटील उपस्थित राहणार आहेत.