जळगाव शहरातील कोंबडी बाजार येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- व्याजाच्या पैशांवरून सुरू झालेल्या वादातून एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजता घडली आहे. या घटनेत संशयित आरोपींनी व्यापाऱ्याला बुलेटवर उचलून नेऊन पाइपने मारहाण केली आणि जिवे मारण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश अशोक मराठे (वय ४४, रा. चौघुले प्लॉट, शनिपेठ) या व्यापाऱ्याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेच्या दिवशी सागर सपके याने व्याजाने दिलेले पैसे परत मागितले. महेश मराठे यांनी ‘मी तुमचे सर्व पैसे परत केले आहेत,’ असे सांगितले. पण हे ऐकून सागर सपके आणि राधेश्याम शर्मा यांचा राग अनावर झाला.
त्यांनी महेश मराठे यांना चक्क बुलेटवरून सागर सपके याच्या कोंबडी बाजार येथील राहत्या घरासमोर नेले. तिथे महेश मराठे यांच्या पाठीवर, दोन्ही हातांवर, दोन्ही पायांच्या मांडीवर बेदम मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच दोघांनी मराठे याला पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर महेश मराठे यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेत सागर सपके व राधेश्याम शर्मा या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे.