तिकिटे, नाणी, सिनेगीतांचा अनोखा कार्यक्रम
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव सांस्कृतिक छंदोमयी मंचातर्फे रविवारी युवराज वाणी यांच्या अध्यक्षतेखाली एका मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध कलांचे सादरीकरण तसेच अनेक माहितीपूर्ण आणि दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांना कला, संस्कृती आणि इतिहासाचा अनोखा अनुभव घेता आला.
कार्यक्रमाची सुरुवात पुरुषोत्तम सारस्वत यांनी केली. त्यांनी राजस्थानी कठपुतळ्यांचा दोरी आणि बोटांच्या साहाय्याने अप्रतिम नृत्य दाखवून उपस्थितांची मने जिंकली. प्राचार्य नारायण पवार यांनी चाळीसगावचे कलाकार के. के. मूस यांचा किस्सा सांगितला, ज्यातून त्यांच्या घरातील आपुलकीचे नाते उलगडले. डॉ. युवराज वाणी यांनी त्यांच्या अनोख्या संग्रहाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी आकाशातील ग्रहांच्या शृंखलेवरील भारतीय पोस्टाची तिकिटे, तसेच जुन्या व आताच्या फिल्मी कलाकारांची तिकिटे प्रदर्शित केली.
जुन्या काळातील मीनाकुमारी, नूतन, देविका राणी, कानन देवी, लीला नायडू, सावित्री यांसारख्या अभिनेत्रींच्या तिकिटांसोबतच अल्लू राम लिंगय्या, भानुमती, बलराज सहानी, सी. व्ही. श्रीधर, चेतन आनंद, कमाल अमरोही, गीता दत्त, कन्नदासन, मदन मोहन, मेहमूद, मोतीलाल, नागेश, ओ. पी. नय्यर, प्रेम नझीर, आर. डी. बर्मन, अशोक कुमार, बी. एन. सरकार, बी. आर. चोप्रा, भालजी पेंढारकर, भूपेन हजारिका, देव आनंद, वीरेंद्रनाथ गांगुली, दुर्गा खोटे, ऋषिकेश मुखर्जी, मजरूह सुलतानपुरी, नौशाद, नितीन बोस, पृथ्वीराज कपूर, राजेंद्र बोराल, रुबी मायर्स, सोहराब मोदी, तपन सिन्हा, यशराज चोप्रा, राज खोसला, राजेंद्र कुमार, राजेश खन्ना, एस. व्ही. रंगराव, सलील चौधरी, संजीव कुमार, शैलेंद्र, बदायुनी, तारचंद बडजात्या, टी. आर. सुंदरम, सूर्या, उत्पल दत्त, विष्णू वर्धन आदींच्या लघुचित्रांचे (प्रदर्शन केले.
याशिवाय, महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त पोस्ट खात्याने काढलेली तिकिटे आणि १५० रुपयांचे चांदीचे नाणेही त्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी देशाच्या पोस्ट खात्याने प्रकाशित केलेली नवग्रहांच्या तिकिटांची माहिती तसेच भारत सरकारने शेअर बाजाराने १५० वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने काढलेले नाणेही त्यांनी उपस्थितांसमोर ठेवले. प्रा. प्रकाश महाजन यांनी त्यांच्या ३२ प्रकाशित पुस्तकांची छायाचित्रे आणि दैनिकांच्या कात्रणांच्या स्वतंत्र फायली दाखवून त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची ओळख करून दिली.
डॉ. नरेंद्र पाटील यांनी माउथ ऑर्गन व बासरीवर मधुर धून वाजवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले, तर प्रमोद नाटेकर, ब्रह्मानंद तायडे व सचिन छाजेड यांनी सदाबहार सिनेगीते सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी भगतभाई वेद, अजय पुरोहित, मयंक वेद, रौनक वेद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश महाजन यांनी अत्यंत खुबीने केले. हा कार्यक्रम कला, माहिती आणि मनोरंजनाचा एक उत्तम संगम ठरला.