एरंडोल शहरातील गाढवे गल्ली परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) एरंडोल शहरांमध्ये रविवारी दिनांक २५ मे रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास ४ ते ५ व्यक्तींनी परिसरात राहणाऱ्या तरुणासह चौघांना लाठ्याकाठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेबद्दल एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
अमोल कैलास पाटील (वय ३०, रा.गाढवे गल्ली, एरंडोल) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमोल पाटील यांच्या घराजवळ संशयित आरोपी राहतात. अमोल याचे वडील कैलास पाटील यांनी माहिती दिली की, शनिवारी दि. २४ मे रोजी दुपारी रेती टाकण्यावरून किरकोळ वाद झाला होता. तो तेव्हा शमला होता. (केसीएन)मात्र आज रविवारी सकाळी ८ ते साडेआठ वाजता पुन्हा एकदा दुचाकी लावण्यावरून परिसरात राहणाऱ्या चार ते पाच संशयित आरोपींनी वाद उकरून काढला. त्यांनी अमोल पाटील याला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली.
त्याला वाचवण्यासाठी गेलेले कुटुंबातील सदस्य जयेश कैलास पाटील, संजय प्रकाश पाटील, सचिन कैलास पाटील, कल्पनाबाई कैलास पाटील यांना देखील संशयित आरोपींनी जबर मारहाण केली आहे. घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर अमोल पाटील याला डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे जळगाव येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.(केसीएन)एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे. या घटनेमुळे एरंडोल तालुक्यात खळबळ उडाली आहे.