पाचोरा तालुक्यातील कृष्णपुरी शिवारातील घटना
पाचोरा ( प्रतिनिधी ) – शहरालगत असलेल्या कृष्णापुरी शिवारातील शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या बकऱ्यांच्या कळपावर हिंस्र प्राण्याने सकाळी हल्ला करीत ११ बकऱ्यांना ठार केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. वन विभागाच्या पथकाने पाहणी करून नागरिकांची संवाद साधला.
कृष्णापुरी शिवारात पुरुषोत्तम महाजन व अविनाश महाजनयांच्या मालकीच्या गट नं. २७/२ या शेतातील कंपाउंडमध्ये असलेल्या शेळ्यांच्या कळपावर सकाळी ७ च्या सुमारास हिंस्र प्राण्याने हल्ला करीत ११ बकऱ्यांना ठार केले. यामुळे शेळीपालकाचे अंदाजे ९० हजारांपर्यंत नुकसान झाले आहे. पुरुषोत्तम महाजन हे सकाळी घराकडे गेले होते. त्यावेळी सर्व बकरी, गायी, म्हशी गोठ्यामध्ये सुरक्षित होत्या. मात्र, घराकडून परत शेताकडे आल्यानंतर ९ वाजेच्या सुमारास शेतात आले असता बकऱ्यांवर हिंसक प्राण्याचा हल्ला झाल्याचे दिसून आले.
यावेळी वनविभागाचे नांद्रा परिक्षेत्रातील वनपाल प्रकाश देवरे यांनी पाहणी केली. पुरुषोत्तम महाजन यांच्या मालकीच्या ७ बकऱ्या व तेथून ५० मीटर अंतरावरील अविनाश राजाराम महाजन यांच्या मालकीच्या ४ बकऱ्या ठार झाल्याचे दिसून आले. २ ते ३ लांडग्यांनी हा हल्ला केल्याचा अंदाज वनपाल प्रकाश देवरे यांनी व्यक्त केला. वन विभागाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.