चोपडा तालुक्यातील अडावद येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) :- भरधाव रिक्षा उलटल्याने एक जण ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास अडावदनजीक घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी आडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष रामदास पाटील (५५, रा. लोणी, ता. चोपडा) असे ठार झालेल्या इसमाचे तर शांताराम वना कोळी (५०), बाळू वामन ठाकूर (६०), कांतीलाल भिला पाटील (३५, सर्व रा. लोणी) हे तीन जण जखमी झाले. यातील कांतीलाल पाटील यांनी प्रकृती गंभीर आहे. ही रिक्षा प्रवाशांना घेऊन लोणीहून अडावदकडे जात होती. त्याचवेळी अडावद येथील बालाजी नगराजवळ रिक्षा उलटली. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलिस ठाण्याचे सपोनि प्रमोद वाघ, हेकॉ. संजय धनगर, सुनील तायडे, शुभम बाविस्कर, भूषण चव्हाण, विजय खैरनार यांनी जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. याबाबत अडावद पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.