भुसावळमधून तरुणाला अटक
भुसावळ ( प्रतिनिधी ) –फरिदाबाद येथे एका डॉक्टरला १७ लाखांहून अधिक रकमेचा ऑनलाइन गंडा घातल्याच्या प्रकरणात, फरिदाबाद पोलिसांनी भुसावळ येथील सिंधी कॉलनीतून निखिल सुनीलकुमार मनवानी या संशयिताला अटक केली आहे. सोशल मीडियावर कमी किमतीत इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली होती.
दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी फरिदाबाद येथील डॉ. श्रीमंत गुईन यांची ऑनलाइन वस्तू खरेदी करताना १७ लाख १० हजार १८० रुपयांची फसवणूक झाली. डॉ. गुईन यांनी ६ सप्टेंबर २०२४ रोजी इन्स्टाग्रामवर एका खात्याची जाहिरात पाहिली, ज्यात कमी दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू विकल्या जात होत्या. त्यांनी त्या खात्याच्या बायोमधील व्हॉट्सअॅप बिझनेस पेजवर संपर्क साधला. त्यानंतर मनीष शर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांना व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला.
डॉ. गुईन यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करताच, त्यांना विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले गेले. त्यांनी अनेक खात्यांमध्ये १७ लाखांची रक्कम जमा केली, परंतु त्यांना वस्तू मिळाल्या नाहीत. यामुळे त्यांना संशय आला आणि त्यांनी फरिदाबाद सायबर क्राईम सेंट्रल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीने डॉ. गुईन यांच्याकडून श्रीनिवास राव (आयडीबीआय बँक) च्या खात्यात १० लाख ९५ हजार १८० रुपये, तपश घोष (इंडसलँड बँक) च्या खात्यात २ लाख ६८ हजार रुपये, दीपक (अॅक्सिस बँक) च्या खात्यात २ लाख ९१ हजार रुपये आणि दशरथ (युपीआय) द्वारे ५६ हजार रुपये ऑनलाइन स्वीकारले.
डॉ. गुईन यांच्या तक्रारीनंतर फरिदाबाद पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध घेतला. तपासात भुसावळ येथील सिंधी कॉलनीतील निखिल मनवानी हा या प्रकरणातील मुख्य संशयित असल्याचे समोर आले. यानंतर फरिदाबाद क्राईम ब्रँचचे पथक भुसावळमध्ये आले आणि त्यांनी स्थानिक बाजारपेठ पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाच्या मदतीने निखिल मनवानी याला अटक करण्यात आली. अटकेनंतर फरिदाबाद पोलिसांचे पथक संशयिताला सोबत घेऊन फरिदाबादला रवाना झाले. सहाय्यक उपनिरीक्षक उधम सिंग या प्रकरणाचा तपास करत आहेत.