आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे प्रकल्पाला गती, अनेक पर्यटनस्थळे जोडली जाणार
महेश पाटील
चाळीसगाव (प्रतिनिधी):- तालुक्याच्या विकासाला गती देणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प, म्हणजेच चाळीसगाव-पाटणादेवी आणि चाळीसगाव-टेकवाडे खुर्द बुद्रुक रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सध्या प्रगतीपथावर आहे. तब्बल १४९ कोटी रुपयांच्या भरीव निधीतून हा ३५ किलोमीटर लांबीचा रस्ता हायब्रीड अॅन्युइटी योजनेअंतर्गत ‘हायटेक’ स्वरूपात साकारला जात आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीने देशातील दळणवळण आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी आणलेल्या या योजनेतून चाळीसगावातील या रस्त्याला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. आ. मंगेश चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या प्रकल्पाला गती मिळाली असून, युध्दपातळीवर काम सुरू आहे. पर्यटन आणि धार्मिक स्थळांना जोडणारा हा रस्ता चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यातील शेकडो गावांना दळणवळण आणि धार्मिक पर्यटनासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. विशेषतः पाटणादेवी आणि ऋषींपांथा ही पर्यटन स्थळे तसेच भडगाव तालुक्यातील कनाशी हे धार्मिक स्थळ या रस्त्यामुळे जोडले जाणार असल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत विभागले आहे. पहिल्या टप्प्यात चाळीसगाव, खरंजई, तरवाडे, न्हावे, ठोमणे, ऋषींपांथा आणि टेकवाडे खुर्द बुद्रुक असा १७ किलोमीटर लांबीचा रस्ता समाविष्ट असून त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या टप्प्यात पाटणादेवी, पाटणागाव, वलठाण, पिंपरखेड,वालझीरी आणि चाळीसगाव असा १८ किलोमीटर लांबीचा रस्ता विकसित केला जाईल. या आधुनिक रस्त्यांमुळे तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळेलच, पण त्याचबरोबर या मार्गावरील गावांमध्ये दळणवळण सुधारेल आणि कृषी क्षेत्रालाही मोठी गती प्राप्त होईल, ज्यामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.