जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
जळगाव ( प्रतिनिधी ) : – येथील समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे दै. ‘साईमत’चे उपसंपादक तथा जामनेर येथील रहिवासी शरद प्रभाकर भालेराव यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ‘समाज चिंतामणी’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी, २० मे २०२५ रोजी आयोजित एका छोट्याखानी कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, ‘सलाम’ काव्यसंग्रह पुस्तक, पेन, शाल, श्रीफळ, बुके असे पुरस्काराचे स्वरुप होते.
यावेळी डाएट कॉलेजचे माजी प्राचार्य तथा माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.डी.कोळी, सिंधूताई सपकाळ यांचे मानसपुत्र डी.बी.महाजन, कवी गोविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद भालेराव यांना यापूर्वीही जळगाव जिल्हा पत्रकार संघ (२०१७), जळगाव-मौलाना आझाद फाउंडेशन (२०२०), चाळीसगाव येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन (२०२१), जळगाव-सेवक सेवाभावी संस्था (२०२१), छ.संभाजीनगर येथील सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवा संस्था (२०२१-२२) अशा पाच संस्थांतर्फे पुरस्काराने गौरविण्यात येऊन यंदाचा हा त्यांचा सहावा पुरस्कार आहे. त्यांनी पत्रकारितेची पदवी (बीसीजे) संपादन केली आहे. ते २००२ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे.
तसेच सुवर्णकार समाज, सामाजिक कार्य यासोबतच त्यांनी अनेक पत्रकार संघटनांच्या माध्यमातून विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. समाज चिंतामणी प्रतिष्ठानने त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रमोद बऱ्हाटे, परेश बऱ्हाटे, सुरेश उज्जैनवाल, छगनसिंग पाटील जिल्ह्यातील समस्त पत्रकार बांधव, सुवर्णकार समाज बांधव तसेच मित्र परिवार, नातेवाईकांसह सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.