अमळनेर शहरातील घटना
अमळनेर ( प्रतिनिधी ) : – बकरी इदचे प्रत्येकी ४० हजार रुपये मिळवून देतो असे सांगत एका दाम्पत्याजवळून ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात इसमाने फसवून पळवून नेल्याची घटना दिनांक १९ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशरफबी फकीर मोहम्मद शेख या मूळ अमळनेर येथील महिला सध्या सुरत येथे राहतात. पुतणीच्या लग्नासाठी पतीसोबत अमळनेरला आले होते. दिनांक १९ रोजी ती स्टेट बँकेतून लाडकी बहीण योजनेचा पैसे काढण्यासाठी अर्बन बँकेसमोर उभी असताना एक जण आला. त्यांना म्हणाला की, तुम्हाला बकरी ईदचे प्रत्येकी ४० हजार रुपयांप्रमाणे ८० हजार रुपये काढून देतो. तो स्टेट बँकेच्या गेट पर्यंत जाऊन कोणाशी तरी फोनवर बोलण्याचे नाटक करुन नंतर साडे बारा वाजता रिक्षामध्ये बसवून तहसील कार्यालयाकडे घेऊन गेला.
झाडाच्या आडोश्याला घेऊन जात त्याने सांगितले की, अंगावरील सोन्याचांदीचे दागिने काढून घ्या. नाहीतर पैसे मिळणार नाहीत. महिलेने तिच्या अंगावरील १४ हजार रुपये किमतीचे ७ ग्राम सोन्याचे टोंगल , १४ हजार रुपये किमतीचे ७ ग्राम वजनाची पांचाळी ,१५ हजार रुपये किमतीचे ४० भार वजनाचे चांदीचे पायातील वाळे व १५०० रुपयांचा मोबाईल असे एका पिशवीत काढून ठेवले. नंतर भामटा हा पती फकीर याला तहसील कार्यालयात घेऊन गेला. परत आल्यावर त्याने सांगितले की काकांचे ४० हजार रुपयांचे काम झाले आहे. आता तुम्ही माझ्याबरोबर चला म्हणून सांगितले. महिलेने सोन्या चांदीचे दागिने पतीजवळ दिले. महिलेला घेऊन तो तहसील कार्यालयात गेला आणि तेथून तिला आधार कार्डची झेरॉक्स काढून आन म्हणून सांगितले. तोपर्यन्त तो फकीर शेख यांच्याकडे आला व अशरफबी यांनी पिशवी मागितली म्हणून दागिन्यांची पिशवी घेऊन निघून गेला.
परत आल्यावर महिलेला फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत. दरम्यान पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी डीबी पथकाला घटनास्थळापासून ते फसवणूक झाली तिथपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासायला सांगून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.