जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक तडवी यांचा शेतकऱ्यांना सल्ला
जळगाव (प्रतिनिधी) :- बोगस बियाणे आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर एकूण १६ पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके वेळोवेळी कारवाई करणार आहेत. शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास किंवा बोगस बियाण्यांबाबत तक्रार करायची असल्यास, १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांनी केले आहे. या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून शेतकरी मदत घेऊ शकतात. शेतकऱ्यांनी सतर्क राहून योग्य बियाण्याची निवड केल्यास आर्थिक नुकसान टाळता येईल आणि चांगल्या उत्पादनाची हमी मिळेल, असेही जिल्हा कृषी अधीक्षक तडवी यांनी सांगितले आहे.
खरीप असो वा रब्बी, प्रत्येक हंगामात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. यावर मात करण्यासाठी आणि बियाणे खरेदी करताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांनी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. बोगस बियाणे ओळखणे कठीण असले तरी, काही उपाययोजना करून शेतकरी फसवणुकीपासून वाचू शकतात.
* बोगस बियाणे कसे ओळखावे ?*
* अधिकृत परवानाधारक आणि पक्के बिल: बियाणे नेहमी अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडूनच आणि पक्के बिल घेऊन खरेदी करा. हे बिल भविष्यात काही नुकसान झाल्यास नुकसानभरपाईचा दावा करताना अत्यंत उपयुक्त ठरेल.
* बियाण्याचे पाकीट आणि माहिती: बियाण्याचे पाकीट उघडण्यापूर्वी त्यातील काही बियाणे बाजूला काढून ठेवा. प्रत्येक पाकिटावर प्रमाणपत्र टॅग आणि मुदतीची तारीख असते, ती काळजीपूर्वक तपासा. ही माहिती पुढील तपासणीसाठी उपयोगी पडते.
* फेरीवाले आणि कमी दर: कोणत्याही फेरीवाल्याकडून किंवा छापील किमतीपेक्षा कमी दरात बियाणे विकत घेत असाल, तर त्या बियाण्याबद्दल लगेच शंका घ्या. अशा बियाण्यांबाबत तात्काळ संबंधित कृषी अधिकाऱ्यांना माहिती द्या. ही बियाणे री-पॅकिंग केलेली असण्याची शक्यता असते, ज्यामुळे उत्पादनात मोठी घट येऊ शकते.
* योग्य कंपनीची निवड: केवळ बाजारात मागणी आहे म्हणून कोणतेही बियाणे खरेदी करू नका. आपल्या जमिनीची पोत आणि उत्पादनक्षमतेनुसार योग्य कंपनीचीच बियाणे निवडा.