अमळनेरच्या आठवडे बाजारात घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- शासकीय बांधकाम ठेकेदाराकडून टक्केवारीच्या हिशोबाने ४० हजारांची रोकड लाच म्हणून स्विकारतांना तामसवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धुळे येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई करत रंगेहात पकडले. लाच घेण्यासाठी या अधिकाऱ्याने अमळनेरच्या आठवडे बाजारात तक्रारदाराला ४ ते ५ वेळा फिरविले. नंतर रोकड घेऊन दुचाकीवरून पसार झाला. मात्र धुळे एसीबीच्या पथकाने पाठलाग करून या अधिकाऱ्याला अटक केली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिनेश वासुदेव साळुंखे (वय ५३ रा. कॉटन मार्केटजवळ, अमळनेर) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार हे शासकीय बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत तामसवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे ५ लाख रुपयांचे काम पूर्ण केले होते. (केसीएन)या कामाचे ४ लाख रुपयांचे बिल तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा झाले होते. सुमारे सात दिवसांपूर्वी तक्रारदार आणि त्यांचे चुलत काका, त्यांच्या दुसऱ्या कामाची चौकशी करण्यासाठी तामसवाडी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी दिनेश साळुंखे यांनी त्यांना अदा केलेल्या बिलाच्या १० टक्के म्हणजेच ४० रुपये लाचेची मागणी केली.
ही बाब तक्रारदाराने तात्काळ दूरध्वनीद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवली. माहिती मिळताच, धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पारोळा येथे जाऊन तक्रारदाराची भेट घेतली आणि त्यांची तक्रार नोंदवून घेतली. १९ मे रोजी या तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता, दिनेश साळुंखे यांनी पुन्हा ४० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.(केसीएन) सापळा रचल्यानंतर, साळुंखे यांनी अंमळनेर येथे दगडी दरवाजासमोर, आठवडे बाजारात राजे संभाजी चौकात ही लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली आणि दुचाकीवरून पळ काढला. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. साळुंखे यांचा मोबाईलही ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई हि धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक रूपाली खांडवी, पो.हवा. राजन कदम, पो. कॉ. प्रशांत बागुल यांनी केली आहे.