महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती
जळगांव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत घेण्यात आलेल्या इ. १० वी (माध्यमिक शालांत परीक्षा) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल १३ मे रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला होता. आता विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका शाळांमार्फत वितरित करण्यात येणार आहेत.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवार २६ मे रोजी सकाळी ११ वाजता गुणपत्रक आणि तपशीलवार गुण नोंद असलेले शालेय अभिलेख वितरित केले जातील. त्याच दिवशी, दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी सर्व शाळांना मंडळामार्फत आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांनी व पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय मंडळांकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत शाळेत उपस्थित राहून आपली गुणपत्रिका घेणे आवश्यक आहे. तसेच, गुणपत्रिका मिळाल्यावर ती नीट तपासून घ्यावी आणि कोणताही गोंधळ असल्यास त्वरित शाळेशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय मंडळातर्फे करण्यात आले आहे.