धुळे (प्रतिनिधी) दोंडाईचा येथील कंजर भाट समाजातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह दि. २९ मे रोजी पहाटे 4 वाजता गुपचूप लावण्यात आल्याची तक्रार दुसऱ्याच दिवशी दि. ३० मे रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी दोंडाईचा पोलिस स्टेशनकडे दिली. मात्र तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी दि. 2 रोजी जिल्हाधिकारी, व पोलिस अधीक्षक तसेच महिला व बाल विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,
दोंडाईचा येथील कंजर भाट समाजातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह दि.२९ मे रोजी पहाटे 4 वाजता समाजातील कोणत्या व्यक्तीला भनक न लागता गुपचूप विवाह सोहळा मसल्या मारूती मंदिर , मालपूर रोड दोंडायचा येथे पार पडला. विवाह झाल्यानंतर मुलीची कौमार्य परीक्षा दोंडाईचा परिसरातील संत कबिरदास (कंजर वस्ती) परिसरात दि. २९ मे रोजीच्या रात्री करण्यात आली. तसेच जात पंचायतच्या पंचांनी 10 हजार रूपये घेऊन विवाह लावून कौमार्य चाचणीला संमती दिली.सदर मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचेही प्रथमदर्शनी समजते.
वास्तवीक पाहता अत्पवयीन मुलीचा विवाह कायद्याने गुन्हा आहे. तसेच सद्यस्थितीत कोरोनामुळे लॉकडाउन सूरू असताना तहसीलदार , तथा संबंधीत अधिकारी यांची विवाहा साठी कोणतीही परवानगी न घेता विवाह संपन्न झाला. यात स्थानिक प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली झाली. त्याचप्रमाणे कंजर समाजातील जातपंचांनी संबंधीत कुटुंबाकडून पैसे घेवून बेकायदा कृत्य करणे , कौमार्य चाचणी करणे तसेच अल्पवयात गर्भधारणा याबाबी सदर घटनेत घडल्या असतील तर ते प्रचलित कायद्यानुसार गुन्हा आहे. त्याच बरोबर कोरोनाचा कहर असतांना अनेक लोक एकत्र येण्यासाठी , धार्मिक विधी करणेसाठी परवानगी आवश्यक असतांना सदर घटना घडणे हे कायद्याचे उल्लंघन केली असून याप्रकरणी सबधिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात आज देखील अत्पवयीन मुलींचे लग्न लावून त्यातून गर्भधारणा राहून अल्पवयीन मुलगी व अपत्य यांच्या हितासाठी व संरक्षणासाठी संबंधीत यंत्रणा योग्य ती काळजी व दखल घेत नसल्याने ही बाब खेदजनक वाटते . म्हणूनच येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा पदाधिकारी जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.सुरेश बिऱ्हाडे, जिल्हा प्रधान सचिव डॉ . दीपक बाविस्कर , कायदेशीर सल्लागार अॅड.विनोद बोरसे तसेच सदर प्रकरणात अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील , जात पंचायत विरोधी अभियानाचे प्रमुख कृष्णा चांदगुडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच महिला व बाल विकास अधिकारी यांना पुढील कार्यवाहीसाठी निवेदन देवून अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.