जळगाव शहरात छ. शिवाजीनगर परिसरात घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ येथून पाळधीला कारने जळगाव शहर मार्गे जात असताना हातात असलेल्या बंदुकीतून गोळी सुटून पुढे असलेल्या मित्राच्या पाठीत घुसल्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. १५ मे रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मित्राला ताब्यात घेऊन अटकेची कार्यवाही सुरू केले आहे. दरम्यान गावठी कट्टे गुन्हेगारांकडे सर्रास असल्याच्या घटना सातत्याने उघड होत असून पुन्हा गोळीबार झाल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उमटले आहे.
नाजूम फिरोज पटेल (वय २३, रा. पाळधी ता. धरणगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो गावात परिवारसह राहतो. त्याचा मित्र तौहिद कय्यूम देशपांडे (वय २३, रा. पाळधी ता.धरणगाव) आणि अजून १ जण असे ३ जण दोघे बुधवारी दि. १४ मे रोजी भुसावळ येथे तृतीयपंथीयांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. काम आटोपून मध्यरात्री पाळधी येथे परत येत असताना त्यांनी महामार्ग टाळून जळगाव शहरात शिरले.(केसीएन)अजिंठा चौक, चित्रा चौक मार्गे शिवाजीनगर उड्डाणपुलावरून ते जुना हायवेदर्शन कॉलनी पासून पाळधीला जाणार होते. दरम्यान शिवाजीनगर उड्डाणपूल ओलांडल्यावर पुढे जाताना कारमध्ये मागे बसलेल्या तौहिद देशपांडे याच्याकडील बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने पुढे बसलेल्या नाजुम पटेल यांच्या पाठीमध्ये ती घुसली.
यामुळे मित्रांमध्ये भय पसरले. दरम्यान नाजूम पटेल याला उपचारासाठी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले तेथे प्रथमोपचार झाल्यावर त्याला छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी नातेवाईकांनी दाखल केले आहे.(केसीएन)तर ज्याच्या हातून बंदुकीची गोळी सुटली त्या तौहिद देशपांडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पदकाने ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान जिल्ह्यात गावठी कट्टा सर्रास आढळत असून गुन्हेगार जेव्हा गुन्हा करतात तेव्हाच गावठी कट्टे समोर येत आहेत. कायदा सुव्यवस्थेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.