जळगाव ( प्रतिनिधी ) : – येथील गोदावरी अभियांत्रिकीत राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या संस्कृत भारतीच्या देवगिरी प्रांताच्या वतीने व डॉ. केतकी ताई पाटील यांच्या अनमोल सहकार्याने व जळगाव जिल्हा संस्था चालक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दि १७ मे रोजी संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले असून संस्कृत विषयावर जनजागृतीसाठी मंथन केले जाणार आहे.
सार्या जगातील विविध क्षेत्रातल्या सर्वश्रेष्ठ विद्वानांनी व वैज्ञानिकांनी जिचा मुक्तकंठाने गुणगौरव केलेला आहे,अशा संस्कृत भाषेचे महत्व व उपयोगिता आपण मात्र अद्यापही बहुजनांपर्यंत पोहोचू शकलो नाही हे सत्य नाकारून चालणार नाही पण असे म्हणून थांबताही कामा नये ह्याच हेतूने गोदावरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड पॉलीटेक्निक जळगाव येथे दिनांक १७ मे रोजी सकाळी दहा वाजता एक संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना आवडीचे विषय निवडण्याची संधी देण्यात आली आहे त्या संधीचा सदुपयोग करून जास्तीत जास्त शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना संस्कृत विषय अध्ययनासाठी कसा उपलब्ध करून देता येईल, त्यात येणार्या संभाव्य अडीअडचणी कोणत्या आणि त्या कशा सोडविता येईल यावर विचार विनिमय होईल मंत्रालयातील प्रशासन अधिकारी वर्ग एक पदावरील संस्कृत भाषेच्या विद्वान लेखिका डॉक्टर मंजुषाताई कुलकर्णी ह्या सुद्धा सदर संवाद परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा जास्तीत जास्त संस्था चालक तथाप्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक यांनी सदर संवाद परिषदेला अवश्य उपस्थित राहून या राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा असे आवाहन संस्कृत भारती च्या वतीने करण्यात येत आहे.