जळगाव कामगार न्यायालयाचा निर्णय
जळगांव ( प्रतिनिधी ) :- चोपडा येथील कामगार कामावर असताना ट्रकवरून खाली पडून गंभीर जखमी झाला होता. यात त्याचे कमरेखालचा भाग निकामी झाल्यामुळे त्याचे चालणे फिरणे बंद झाले. याबाबत विमा कंपनीविरुद्ध कामगार न्यायालयात दाखल दाव्यामध्ये कामगाराला अखेर न्याय मिळाला असून त्याला २१ लाख २१ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. याकरिता न्यायाधीशांनीदेखील माणुसकी दाखवून न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उतरून कार्यवाही पूर्ण करीत कामगाराप्रती सहानुभूती दाखवली.
चोपडा येथील रहिवासी शेख मोहम्मद अदीलुद्दिन अलिमुद्दिन या कामगाराचा त्याच्या मालकाकडे ट्रकवर कामावर असतांना उभ्या ट्रकवरून पाय सटकून खाली पडून अपघात झालेला होता. सदर अपघातात अदीलुद्दिन याचा कमरेपासून खालचा भाग पूर्णपणे निकामी झाला व त्याचे चालणे-फिरणे पूर्णपणे बंद झाले. या कारणास्तव त्याने जळगांव येथील वकील दिपक कृ. समदाणी, अक्षय दि. समदाणी व कार्तिक दि. समदाणी यांचेमार्फत कामगार न्यायालयात प्रकरण दाखल केले. यात अर्जदाराच्या वकिलांनी अर्जदारातर्फे सर्व पुरावे दाखल करून सामनेवाला विमा कंपनी यांचेशी तडजोडीची बोलणी केली.
मोठ्या परिश्रमानंतर कंपनीशी अनेकवेळा वाटाघाटीची बोलणी केल्यानंतर अॅड. समदाणी यांनी अर्जदारास नुकसान भरपाईची एकूण रक्कम रु. २१,२१,९७०/- ही मिळवून दिली. या बाबीचे कामगार न्यायाधीश यांनी देखील कौतुक केले. विशेष म्हणजे कामगार न्यायालय हे बी. जे. मार्केट येथे तिसऱ्या मजल्यावर असल्याने व अर्जदारास जिने चढून वरती जाणे शक्य नसल्याने कामगार न्यायाधीश बलवाणी यांनी स्वतः तीन मजले खाली उतरून तडजोडीचे प्रकरण मार्गी लावून न्याय केला.
यावरून न्यायालयाच्या पक्षकारां बाबतच्या सहानुभूतीपूर्वक दृष्टीकोणाचे दर्शन घडले. याबाबत सर्व उपस्थितांनी न्यायाधीश बलवाणी यांचे आभार मानले. या वेळी विमा कंपनीचे अॅड. फडके, अॅड. समदाणी, अर्जदार व ईतर कर्मचारी उपस्थित होते. अॅड. समदाणी यांना कामकाजात त्यांच्या कार्यालयाचे सहकारी मोहसीन अली यांचे देखील सहकार्य लाभले.