जामनेर तालुक्यात रोहिणी हॉटेलजवळ घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- जामनेर तालुक्यात अपघाताची दुसरी घटना घडली आहे. लग्नाहून घरी परतणाऱ्या वऱ्हाडींना घरी घेवून जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने क्रुझर वाहन पलटी झाले आहे. या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर ९ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १० मे रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास रोहिणी हॉटेलजवळ घडली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.

दशरथ रतन चव्हाण (वय ५५ रा. फर्दापूर ता.सोयगाव जि. छत्रपती संभाजी नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. जामनेर तालुक्यातील टाकळी येथे लग्न असल्याने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फर्दापूर येथील रहिवाशी असलेले लग्नाचे वऱ्हाड हे शनिवारी १० मे रोजी लग्नासाठी आलेले होते. लग्न आटोपल्यानंतर लग्नातील वऱ्हाड मंडळी क्रुझर वाहनाने फर्दापूर गावाकडे जाण्यासाठी जामनेर रोडने निघाले. रस्त्यावरील रोहिणी हॉटेल समोर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले. या वाहनात बसलेले दशरथ चव्हाण यांचा जागेवरच मृत्यू झाला.तर सोबत असलेले लखिचद शंकर चव्हाण (वय ५०), मोहनदास शंकर जाधव (वय ५०), विक्रम मोतीलाल चव्हाण (वय २५), बाबू पांचु जाधव (वय ७५), उखा दलू राठोड (वय ६५), धिरलाल सदू राठोड (वय ६५), हिरा महारु चव्हाण (वय ५८), प्रतीक प्रवीण राठोड (वय ७), भिवसिग मनुर चव्हाण (वय ७५) सर्व रा. फर्दापूर ता.सोयगाव जि. छत्रपती संभाजी नगर हे जखमी झाले. त्यांनी शासकीय रूग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. बोदवड येथील रूग्णवाहिकेचे चालक मनोज तेली, डॉ. मुख्तार पटेल, शेदुर्णी येथील चालक सुनिल लोखंडे आणि डॉ. अनिकेत सोनवणे यांनी जखमींना उचलून उपचारासाठी रूग्णालयात आणले आहे.

