जामनेर तालुक्यातील फत्तेपूर हद्दीतील घटना, जावयावर गुन्हा दाखल
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावात गर्भवती पत्नीस भेटण्यासाठी सासरी आलेल्या एका जावयाने आपल्या अल्पवयीन मेहुणीला दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीची आई आणि संशयिताची सासू हिने फत्तेपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
फिर्यादी महिलेची मोठी मुलगी सध्या गर्भवती असून तिचा पती काही दिवसांपूर्वी सासरी राहण्यासाठी आला होता. दरम्यान, अल्पवयीन मेहुणीला तब्येतीची तक्रार असल्याचे सांगून जावयाने तिला दवाखान्यात घेऊन जातो असे सांगितले. विश्वासाने त्यांनी मुलीला त्याच्यासोबत पाठवले. मात्र सायंकाळपर्यंतही दोघे घरी न परतल्याने त्यांच्या अनुपस्थितीची चिंता वाढली. कुटुंबीयांनी आसपासच्या गावांमध्ये शोधाशोध केली, मात्र काहीच माहिती मिळाली नाही. अखेर मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेतली. जावयाविरुद्ध अल्पवयीन मुलीला फसवून पळवून नेल्याची तक्रार दिली. फत्तेपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपीच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.