जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील ममुराबाद गावात एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. ५ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेबद्दल जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निकालात त्याला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असे मित्रानी सांगितले.
ऋषिकेश दिनेश पाटील (वय १८ वर्ष, रा. ममुराबाद, ता. जि. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा तरुण आई-वडील, आजी आणि मोठ्या भावासोबत ममुराबाद येथे वास्तव्याला होता. त्याने विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती.(केसीएन) ऋषिकेशचे वडील हे शेती काम करून रसवंती गाडा चालवितात. ऋषिकेशचा मोठा भाऊ फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आज सोमवार दि. ५ मे रोजी दुपारी १ वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. या निकालात ऋषिकेश पाटील याला ४९ टक्के गुण मिळाले. मिळालेले गुण त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याने त्याला नैराश्य आले. या नैराश्यातूनच त्याने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर कोणी नसताना गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
ही दुर्देवी घटना आईच्या लक्षात आली. ऋषिकेशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.(केसीएन) यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या घटनेमुळे संपूर्ण पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ममुराबाद गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. ही बातमी पसरताच रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती.