चाळीसगाव वनविभागाची कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – जंगलातील हरणांची शिकार करणाऱ्या संशयित आरोपींना येथील वनविभागाच्या पथकाने पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाच शिकारी वाहन सोडून फरार झाले होते. त्या पैकी वकील अहमद शकील अहमद (वय २८) या संशयिताला वन विभागाच्या पथकाने मालेगाव येथून अटक केली.
एका कारमध्ये हरणांची शिकार करून त्यांची वाहतूक केली जात असल्याची माहिती चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन चाळीसगाव धुळे बायपास रस्त्यावर १ रोजी पहाटे चारपासून सापळा रचला. छत्रपती संभाजीनगरकडून धुळ्याकडे जाणारी संबंधित कार भरधाव येताना दिसली. वनविभागाच्या कर्मचा-यांनी कारला हात देऊन ती थांबविण्याचा इशारा केला. मात्र कार धुळेच्या दिशेने भरधाव निघाली. यानंतर वनविभागाच्या पथकाने कारचा पाठलाग सुरू केला.
कार पुढे व वनविभागाची गाडी मागे अस चाळीसगाव ते धुळे, तासभर पाठलाग सुरू असताना धुळ्याजवळ आल्यानंतर ते पाचही संशयित कार सोडून फरार झाले. कारच्या तपासणीत पाच हरणे मृतावस्थेत आढळली, ज्यात दोन नर व तीन मादीचा समावेश होता. या प्रकरणी वन विभागाने वकील अहमद शकील अहमद यास अटक केली आहे.