धरणगाव तालुक्यात मध्यरात्री चोरट्यांचे कृत्य
धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाळधी येथे श्री सिद्धी महागणपती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजाचे लोखंडी शटर तोडून आत प्रवेश करत ७४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शनिवारी, ३ मे रोजी सकाळी ६.३० वाजता उघडकीस आली. याबाबत मंदिराचे व्यवस्थापक विनायक तायडे यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात श्री सिद्धी महागणपतीचे नव्याने मोठे मंदिर उभारले जात आहे. दि. २ आणि ३ मे च्या दरम्यानच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लोखंडी शटरचे कडी-कोयंडे तोडले. त्यानंतर मंदिरात प्रवेश करत चोरट्यांनी दानपेटीतील सोन्याचे दागिने आणि काही रोकड असा एकूण ७४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरीची ही घटना शनिवारी ३ मे रोजी सकाळी साडेसहा वाजता भाविकांच्या निदर्शनास आली. मंदिराचे व्यवस्थापक विनायक तायडे यांनी तात्काळ धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल पाटील करत आहेत.