भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोळगाव येथे शाळेचा अभ्यास घेत असताना मुलास बेदम मारहाण करणाऱ्या पित्यास भडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हि घटना दि. २९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता उघडकीस आली आहे. पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होऊन याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
कोळगाव येथे एका लहान मुलाचा अभ्यास घेत असताना त्याचा पिता हा त्याला मारहाण व शिवीगाळ करीत होता. याबाबतचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सदर व्हिडिओबाबत माहिती घेतली असता भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कोळगाव ता. भडगाव येथील असल्याची खात्री भडगाव पोलिसांना झाली.(केसीएन)भडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकार, पोलीस कॉन्स्टेबल परदेशी, सुनील राजपूत अशांनी भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे जाऊन व्हायरल व्हिडिओमध्ये मुलास मारहाण व शिवीगाळ करणारा इसम याच्या घरी जाऊन त्याचा शोध घेतला.
त्याने त्यांचे नाव सुनील भास्कर पवार (वय ५०,रा. कोळगाव ता. भडगाव) असे सांगितले. त्यावरून त्यास व्हायरल झालेल्या व्हिडिओ बाबत विचारपूस केली असता त्याने सदर व्हिडिओ हा माझाच आहे व माझ्या मुलाचा अभ्यास घेत होतो.(केसीएन)तो शाळेत जात नसल्याने त्यास मारहाण व शिवीगाळ केली असलेबाबत त्याने कबुली दिलेली आहे. त्यावरून भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार प्रवीण परदेशी यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन भडगाव पोलीस स्टेशन येथे संशयित आरोपी सुनील पवार याचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पुरुषोत्तम पाटील हे करीत आहेत.