मुंबईच्या महिलेला अमळनेरात सुखद अनुभव
अमळनेर (प्रतिनिधी) : मुंबईतील एका महिलेची रिक्षामध्ये हरवलेली सोन्याच्या दागिन्यांची पर्स रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाने आणि पोलिसांच्या मदतीने सुखरूप परत मिळाली आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत झाली.
मीना प्रमोद सोनवणे (वय ५२, रा. गोरेगाव, मुंबई) असे या महिलेचे नाव आहे. मीना सोनवणे मुली आणि नातेवाईकांसह खान्देश एक्सप्रेसने अमळनेर येथे आल्या होत्या. स्टेशनवरून उतरल्यावर सामान जास्त असल्याने त्यांनी दोन रिक्षा केल्या. एका रिक्षामध्ये सामान आणि दुसऱ्यामध्ये त्या स्वतः व इतर नातेवाईक बसून डॉ. अंजली चव्हाण यांच्या दवाखान्याजवळ उतरले. त्यानंतर दुसऱ्या रिक्षाने वावडे येथे जात असताना ढेकू गावाजवळ त्यांच्या लक्षात आले की त्यांची पर्स कुठेतरी हरवली आहे. घाबरलेल्या मीना सोनवणे यांनी तातडीने अमळनेर पोलीस स्टेशन गाठून परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांना घडलेली हकीकत सांगितली. मात्र, त्या नेमक्या कोणत्या रिक्षामध्ये बसल्या होत्या, हे त्यांना आठवत नव्हते.
डीवायएसपी बारबोले यांनी तात्काळ कारवाई करत डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, निलेश मोरे आणि विनोद संदानशीव यांना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे आदेश दिले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मीना सोनवणे या मिलचाळ येथील प्रभाकर सुखदेव साळी यांच्या (एमएच १९ बी झेड ५०९१) क्रमांकाच्या रिक्षामध्ये बसल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्वरित त्या रिक्षाचा शोध घेऊन चालकाशी संपर्क साधला. विचारपूस केली असता, ती पर्स रिक्षाच्या मागील बाजूस असल्याचे चालकाने सांगितले. पोलिसांनी तातडीने ती पर्स ताब्यात घेऊन मीना सोनवणे यांना परत केली. त्या पर्समध्ये गळ्यातील सोन्याची पोत आणि कानातील रिंग असे दोन तोळ्यांचे सोने होते. रिक्षाचालक प्रभाकर साळी यांनी देखील प्रामाणिकपणे पर्स शोधून ठेवल्याची कबुली दिली.