धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील पाळधी ते पथराड गावांदरम्यान शेतातून घरी परत येत असलेल्या तरुण शेतकऱ्याचा भीषण अपघात झाला. यात गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
राकेश श्यामसुंदर चव्हाण (वय ४१, रा. ओमशांती नगर, पिंप्राळा, जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. पिंप्राळ्यात राकेश चव्हाण हे आई, पत्नी, १ मुलगी, लहान भाऊ यांचेसह राहत होते. शेतीकाम करून ते उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)राकेश यांची अहिरे ता. धरणगाव येथे स्वतःची शेती आहे. शेतीकामानिमित्त राकेश चव्हाण हे दि. १४ एप्रिल रोजी सकाळी गेले होते. तेथून संध्याकाळी परतत असताना ५ ते ६ वाजेच्या सुमारास पथराड ते पाळधी गावादरम्यान त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.त्यांना कुटुंबीयांनी उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.
उपचार सुरु असताना ५ दिवसांनी राकेश चव्हाण यांची शनिवारी दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालविली.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, अपघाताची माहिती घेण्याचे काम पाळधी पोलीस करीत होते. पुढील कार्यवाहीसाठी राकेश चव्हाण यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह कुटुंबियांना देण्यात आला. घटनेची रामानंद नगर पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे पिंप्राळा परिसरात शोककळा पसरली आहे.