रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील घटना
रावेर (प्रतिनिधी) : कर्जबाजारीपणामुळे तालुक्यातील अहिरवाडी येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विलास युवराज चौधरी (वय ४०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. विलास चौधरी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. शुक्रवारी विलास चौधरी हे शेतात गेले होते. परंतु, सायंकाळ झाल्यानंतरही ते घरी परत आलेच नाहीत, म्हणून त्यांचा शोध घेतला असता अहिरवाडी शिवारातील गट नंबर ७९ या त्यांच्या स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. सततची नापीकी तसेच त्यांचे नावावर युनियन बँकेचे दोन लाख रुपयांचे कर्ज आहे. या कर्जामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. याबाबत नीळकंठ चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास रावेर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे अहिरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.