जळगाव ;- आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना ठेवून सामाजिक कार्य केल्यास त्याचे सार्थक निश्चितच होते, समाज सुखी तर आपण सुखी ही भावना ठेवून सामाजिक कार्य करणारी शहरातील ‘रॉबिनहूड आर्मी’ नामक संघटना समाजातील गोरगरिब, गरजू आणि भुकेल्या लोकांना जेवण देण्याचं काम करत असते. सध्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉक़डाऊनच्या दरम्यान गोरगरीबांचे फार हाल होत आहे. अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत नाहीये. म्हणूनच रॉबिनहूड आर्मी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दररोज सेवा देत गरीब, भुकेल्यांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करून देत आहे.
‘रॉबिनहूड़ आर्मी’ ही एक स्वयंसेवी व अंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी सामाजिक संघटना आहे. जळगाव शहरातील महाविद्यालयीन विदयार्थी तसेच प्रतिष्ठित लोकं एकत्र येऊन शहरात या रॉबिनहूड आर्मी अतंर्गत सामाजिक कार्याकरिता सरसावले आहे. ज्यात युवक, विद्यार्थी, डॉक्टर, वकील, सीए, उच्चपदस्थ अधिकारी आदींचा समावेश आहे. यात अनेक समाजातील व्यक्ति जुळलेले आहे. यामुळे सामाजिक ऐक्य असलेली ही संपूर्ण टीम आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून भूकेल्यांची भुक भागविण्याचे काम करत असते. समाजातील गरीब, अनाथ, बेघर लोकांच्या भूक शमविण्यासाठी रॉबिनहूड़ आर्मीचे स्वयंसेवक तनामनाने काम करीत असतात.
ऐरवी लग्नसमारंभ, वाढदिवस किंवा इतर समारंभ तसेच हॉटेल्स-रेस्टॉरंटमधील शिल्लक अन्न संकलित करून ते वाया जाऊ नये म्हणून गरजूंना पोहोचवण्याचं काम निरंतरपणे ही संस्था करत असते. इतकेच नाही तर ही संस्था झोपडपट्टी भागातील मुलं जी शाळेत जात नाही त्यांना शिक्षित करण्याचे काम ही करते तसेच त्या मुलांना कपडे पुरवण्याचे काम देखील रॉबिनहूड आर्मी द्वारे केले जाते.
या रॉबिनहूडच्या माध्यमातून सामाजिक सेवा देण्याचं काम हे ‘रॉबिन्स’ दिवस-रात्र करतायेत. शहरातील फूटपाथ, रेल्वे स्टेशन, जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे व झोपडपट्टीतील गरीब भुकेल्यांना दोन वेळेचे जेवण वाटप करते. विगत दोन वर्षांपासून रॉबिनहूड आर्मी जळगाव शहरात कार्यरत आहेत. पूर्वी दिवसाला 500 लोकांना जेवण दिले जात होते जे आता लॉकडाऊनच्या काळात 1500 जणांना जेवण वाटप करीत आहे
अगदी नि:स्वार्थपणे आणि स्वयंस्फूर्तिने हे काम केले जात आहे. या कामी रॉबिनहूड आर्मीची मोठी टीम सक्रीय आहे. लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये जळगाव शहरातील गरीब आणि गरजू लोकांना ते मदतीचा हात देत आहे. 24 मार्च 2020 पासून ते आत्तापर्यंत रॉबिनहूड आर्मी दररोज जेवण पुरवित आहे.
लॉकडाऊनमुळे गरीबांना खायला जेवण मिळत नाहीये. तेव्हा रॉबिनहूडतर्फे अधिक क्षमतेत सेवा दिली जात आहे. प्रति दिवस 1500 लोकांना जेवण दिले जाते. शहरातील मोहाडी रोडचा भाग, कृष्णा लॉन्स समोरील वस्ती, हरी विठ्ठल नगर, तांबापूरा, भिलाटी, मेहरूण, फातेमा नगर, एमआयडीसी एरिया, रायपूर एमआयडीसी, खेडी, राम नगर, हुडको आदि भागातील गरजूंना रॉबिनहूड न चुकता तयार केलेले जेवण उपलब्ध करून देत आहे. याचबरोबर अत्यंत गरजूंना आवश्यकतेनुसार किराना ही उपलब्ध करून दिले जात आहे. एका कुटुंबाला दहा दिवस पुरेल इतका किराणा असतो.
सध्या लॉकडाऊन असल्याने मनुष्या बरोबरच प्रत्येक जीव भुकेला व तहानलेला आहे. पशु, पक्षी आणि रस्त्यांवरील मुके जनावरांचे ही खाण्याचे हाल होत आहे. ही गोष्ट लक्षात घेता रॉबिनहूड आर्मी ने जनावरांनाही जेवण उपलब्ध करून दिले आहे.
नुकतेच पवित्र रमजान महिना सुरु आहे. तेव्हा रोजा धरून ऱॉबिनहूडचे काही स्वयंसेवकदेखील अखंडितपणे जेवण उपलब्ध करण्याचं काम करत आहे. असं म्हणतात की जर आपल्या हातून चांगले सत्कार्य होत असेल किंवा कुणाची मदत करत असाल तर त्याचा गाजावाजा करता कामा नये. असे केल्याने मनुष्याची स्वार्थी वृत्ती दिसून येते. मात्र रॉबिनहूड आर्मीच्या या उपक्रमाचा याठिकाणी उहापोह करण्याच कारण आहे. जेणकरून यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि समाजकार्यात, गरीबांना मदत करण्याची वृत्ती बाळगून भुकेल्यांची भूक भागवावी, एवढाच प्रयत्न आहे.
बहुतांश समारंभामध्ये शिल्लक राहिलेलं अन्न फेकून दिले जाते. ते अन्न ऱॉबिनहूड आर्मीची टीम आपल्या ताब्यात घेऊन शहरातील भुकेल्या लोकांना जेवण उपलब्ध करून देते. प्रसंगी आपल्याकडून जेवण तयार करून गरजूंना उपलब्ध करून देते. या कामात विविध संस्था, संघटना देखील ‘रॉबिनहूड आर्मी’ ला सहकार्य करीत असतात. या लॉकडाऊनच्या काळात इंडियन रेडक्रॉस सोसायटी, लाडवंजारी हॉल, खेडी येथील गायत्री सोनवणे आदि संस्था व व्यक्ति रॉबिनहूडला दररोज अन्न उपलब्ध करून देत आहेत तसेच रॉबिनहूड स्वत: 500 लोकांचं जेवण तयार करून त्याचे वाटप करते.
देशभरात मोठ्या प्रमाणावर भूकेमुळे लोकांचा मृत्यु होत असतो. भूकेच्या व्याकुळतेने प्रेरित होऊन दिल्ली युनिव्हर्सिटीच्या काही विद्यार्थ्यांनी मिळून ‘ऱॉबिनहूड आर्मी’ ची स्थापना केली. सप्टेंबर 2014 मध्ये दिल्ली येथे नील घोष यांनी ‘ऱॉबिनहूड आर्मी’ स्थापना केली. आज भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, नायझेरिया, नेपाळ, श्रीलंका, बँकॉक, केनिया, उत्तर व दक्षिण अमेरिका आणि बांग्लादेश सहित 18 देशांमध्ये आणि 70 शहरांमध्ये ही ‘ऱॉबिनहूड आर्मी’ संघटना कार्यरत आहे. शहरात कुठेही लग्न असो, पार्टी असो किंवा हॉटेल्स, रेस्टॉरंटशी संपर्क साधून त्यांच्याकडे शिल्लक असलेले अन्न घेऊन ते झोपडपट्टी, पुनर्वसन कॉलनी भागातील गरजूं, वृद्ध, बालक, महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम ‘ऱॉबिनहूड आर्मी’ची टीम करते.
जळगाव शहरात गेल्या दोन वर्षांपूर्वी चार्टड अकाउन्टंट दर्शन जैन आणि अलफैज पटेल यांनी मिळून रॉबिनहूड आर्मीची सुरुवात केली. जैन व पटेल यांनी या संदर्भात माहिती देतांना सांगितले की, लॉकडाऊच्या पार्श्वभूमीवर आम्ही गरजवंतांना जेवण उपलब्ध करून देत आहोत. यापूर्वी हे काम निरंतपणे सुरू होतं, आहे आणि निश्चितच यापुढेही सुरू राहिल.
क्वॉरेंटाईन 1.0 मध्ये 21 दिवसांच लॉकडाऊन अर्थात 24 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत 14140 लोकांना जेवण उपलब्ध करून दिले गेले. 15 एप्रिल ते आजपर्यंत दररोज 1400 ते 1600 लोकांना दोन वेळचे जेवण दिले जात आहे.
ज्यांना समाजाची स्पंदनं समजतात त्याच व्यक्ती भविष्यात विशेष कार्य घडून आणतात असेच कार्य ऱॉबिनहूड आर्मीची टीम करीत आहे. “रॉबिनहूड आर्मी’ ची समाजाप्रती असलेली तळमळ आणि टीमवर्क यातून साध्य होत असलेलं हे सामाजिक कार्य खरोखरच इतरांना प्रेरणा देणारा आहे.
रॉबिनहूडचे अलफैज पटेल, सागर पाटील, इरफान पिंजारी, गोपाल टेमकर, रोहित सोनवणे, श्री सोनार, समीर शेख, अमित गगनानी, वकार शेख, सागर बांभुर्ले, शोएब शेख, नुमान खाटीक, अमोल रंगोली, विनय दुग्गड, नयन गांधी, फजल शेख, जावेद तडवी, डॉ. सुयोग सोमाणी, चार्टंड अकाउंटंट दर्शन जैन, प्रथम भरवाणी, परीश कोळी, हसन शेख, संगीता चावला, प्रियंका कुकरेजा, पूजा लुनिया, रेणुका पाटील, धनश्री माळी, प्रियंका शाह, दीपक आहुजा, आशिष पाटील आणि योगेश सोनी यांसह संपूर्ण टीम या मदत कार्यात परिश्रम घेत आहे.