जळगाव — हर्ष व उत्साहाची पर्वणी रमजान ईद नुकतीच साजरी करण्यात आली त्याच अनुषंगाने ईदचा हा आनंद आप्तस्वकियांसह द्विगुणित व्हावा तसेच राष्ट्रीय एकात्मता बंधुता प्रेम व जातीय सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये ईद मिलन समारोह संपन्न झाला.

गोदावरी अभियांत्रिकीत जमाअत- ए – इस्लामी हिंद, जळगाव यांच्या तर्फे आयोजन करण्यात आले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. सोहेल अमीर शेख (जिल्हाध्यक्ष जमाअत ए इस्लामी हिंद, इकरा कनिष्ठ महाविद्यालय, मेहरून) तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील याचबरोबर प्रा. रफिक पटवे सर (मिल्लत हायस्कूल माजी पर्यवेक्षक), प्राध्यापक शेख ताजुद्दीन सर (माजी पर्यवेक्षक व क्रीडाशिक्षक), सामी साहब सर (दावा सचिव, जमाते इस्लामी हिंद) यांची विशेष उपस्थिती तसेच या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रफिक पटवे यांनी कुराण पठण केले व मराठी नाद (कविता) सादर केली.त्यानंतर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी ईद मिलन समारोह बद्दल सर्वांनी सुख शांती व समाधानाने जीवन व्यतीत करणे गरजेचे आहे जेणेकरून सर्वधर्म भाव जोपासला जाईल असे सांगितले तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. सोहेल शेख यांनी ईद चे महत्व पटवून देतांना रमजान महिना त्याग आणि तपस्याचा असून अतिशय पवित्र सण आहे. सर्व धर्म आणि पंथाचे लोक एकत्र येऊन सर्व सण साजरे करतो जेणेकरून एकता आणि परस्पर बंधुभाव टिकून राहतो. हा देश सर्वधर्म आणि वर्गाचा देश आहे.तसेच त्यांनी काही सत्य परिस्थिती वर भाष्य केले.आपण सर्वजण ग्लोबली कनेक्ट होत आहे परंतु परस्पर संबंध जोपासणे गरजेचे आहे. ईद म्हणजे फक्त चांगले कपडे परिधान करणे नसून प्रेम आणि ईश्वराशी जोडण्याचा मार्ग आहे.कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल व त्याचे महत्त्व सांगितले. आजच्या दिवसाचे औचित्य साधून आपल्या सर्वांच्या विचारांचे आदान-प्रदान होणे गरजेचे आहे हे नमूद केले. विविध भाषा बोलणारे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस भारताची उन्नती होऊन भारताची विशालता दिसते. तसेच त्यांनी जमाअत ए हिंद च्या कार्या बद्दल माहिती दिली.कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी शीरखुरमा चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सर्वांनी शीरखुरमा चा आस्वाद घेतला. सदर कार्यक्रमाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील , वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.आसिफ खान (स्पोर्ट्स डायरेक्टर) यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तरन्नुम पिंजारी, शेख काशीफ व रोजीना खातीक यांनी केले.