धरणगाव, जळगाव, भुसावळ, पाचोरा विभागात शेतकऱ्यांना दिलासा
जळगाव (प्रतिनिधी) :- सौरऊर्जा निर्मिती, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना आणि त्यातून शेतकऱ्यांना दिवसाच्या कालावधीत वीज पुरवठा देण्याचा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. त्यांअतर्गत महावितरणच्या जळगाव परिमंडलात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी कार्यक्रमाला वेग देण्यात असून नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत जळगाव जिल्ह्यात ४५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे ८ प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. त्यातून सुमारे १२ हजार शेतकऱ्यांना दिवसाच्या कालावधीत अखंडित व सुरळीत वीजपुरवठ्यांची सोय झाली आहे.
नोव्हेंबर २०२४ ते ३१ मार्च या कालावधीत जळगाव जिल्ह्यात महावितरणच्या धरणगाव विभागातील वावडे उपकेंद्रात ४ मेगावॅटचा मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी प्रकल्प राबविण्यात आला. त्याअंतर्गत वावडे कृषी वाहिनीवरुन ७६० शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याचा लाभ होत आहे.(केजीएन)याच विभागात कुऱ्हे (बु.) येथे ५ मेगावॅटचा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला असून त्यावरुन कुऱ्हे व टाकरखेडा कृषी वाहिनीवरील १३५० शेतकरी लाभार्थी आहेत. याच विभागातील चांदसर उपकेंद्रास ४ मेगावॅट सौर ऊर्जेची रसद पूरविण्यात आली असून त्यावरुन चोरगाव व पथराड कृषी वाहिनीवरील सुमारे २ हजार कृषी ग्राहक सौर ऊर्जेचा लाभ घेत आहेत.
पाचोरा विभागात लासगाव उपकेंद्रास ५ मेगावॅट सौरऊर्जेची जोड देण्यात आली आहे. त्यावरुन लासगाव वाहिनी – ५००, भामरुड व भामरुड खडकी वाहिनीवरील १२०० तर नांद्रा कृषी वाहिनीवरील ६०० शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याचा लाभ होत आहे. याच विभागात सावखेडा (होळ) हा सर्वाधिक ९ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला असून त्यावर इटवे, मोहाडी, पाडसखेडे, कोन्हेरे व पारवे या पाच कषी वाहिनीवरील १६०२ कृषीपंपधारकांना दिवसा सिंचनाची सोय झाली आहे.(केजीएन)पाचोरा विभागातीलच बहादरपूर (महालपूर) येथे ६ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला असून त्याअंतर्गत मोंडरे, बद्रीनारायण व भिलाणी कृषी वाहिनीवरील १६०४ शेतकऱ्यांची दिवसाच्या कालावधीत सिंचनाची सोय झाली आहे.
भूसावळ मधील वेल्हाळे हा ८ मेगावॅट सौर ऊर्जेचा प्रकल्पही या आधीच कार्यान्वीत झाला असून त्यावरील वेल्हाळे, किन्ही व साखर कृषी वाहिन्यावरील १ हजार शेतकरी या प्रकल्पाचे लाभार्थी आहेत.(केजीएन)चाळीसगाव विभागातील सांगवी ३३/११ उपकेंद्रांर्गत ४ मेगावॅटचा मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी प्रकल्पही कार्यान्वीत झाला असून त्यावरील बोडरी, लांजे, बानगाव राजंनगाव कृषी वाहिन्यांवरील १९३२ कृषी वीज ग्राहकांना दिवसाच्या कालावधीत सिंचनाची सोय झाली आहे.
जळगाव विभागात विटनेर येथील ३ मेगावॅटचा सौरकृषी प्रकल्प कार्यान्वीत झाला असून त्यावरील सुमारे हजार शेतकऱ्यांना दिवसाच्या कालावधीत विजेचा पुरवठा होत आहे. परिमंडलात मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांच्यासह इतर सर्व अभियंत्याच्या प्रयत्नाने इतर प्रकल्पांचेही काम प्रगतीपथावर आहे. गोळेगावचा ४ मेगावॅट, धुळे जिल्ह्यात चिंचखेडेचा २ मेगावॅट व कुन्दाने (वार) हा ५ मेगावॅटाचा मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी प्रकल्पही लवकरच पूर्णत्वास येवून कार्यान्वीत होण्याची शक्यता आहे.