मुंबई : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात पावसासह ‘निसर्ग चक्रीवादळा’ची किंवा जोराने वाहणाऱ्यां वाऱ्यांची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या कोविड आरोग्य केंद्रांची संरचनात्मक तपासणी तातडीने करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. संबंधित कंत्राटदारांनी त्यांच्या स्तरावर ही तपासणी करुन घ्यावी. तसेच आवश्यकता असल्यास तेथील रुग्णांना पक्के बांधकाम असलेल्या ठिकाणी तातडीने हलवावे, असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही त्यांच्या स्तरावर आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, समुद्रकिनारी जाऊ नये. महापालिका व शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे एका मैदानावर उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील समर्पित आरोग्य केंद्रात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना पक्के बांधकाम असणा-या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.