जळगावात सदाशिव नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : येथील सदाशिव नगरात शेत जमिनाला वारस लावण्यावरून वाद होऊन मेहुण्यानी पाहुण्यांवर शुक्रवारी चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. त्यात या तरुणाचा सोमवारी १४ एप्रिल पहाटे ५ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी दोन्ही मेहुण्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तौफिक कय्यूम पिंजारी (वय-३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. सदाशिव नगरात मालवाहू रिक्षाचालक असलेले तौफीक पिंजारी हे कुटुंबासह वास्तव्याला होते. तौफीक पिंजारी व त्यांचे मेहुणे अस्लम समशोद्दीन पिंजारी व शफिक गफूर पिंजारी यांच्यामध्ये शेत जमिनीला वारस लावण्यावरून वाद झाले होते. शुक्रवारी दि. ११ एप्रिल रोजी तौफीक यांच्या सदाशिव नगरातील घरी जाऊन त्यांना दोन्ही मेहुण्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली होती. यात अस्लम याने तरुणाच्या पोटाच्या डाव्या बाजूला कमरेजवळ चाकूने वार केला होता. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी १३ एप्रिल रोजी रात्री त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यानुसार त्यांना तेथे नेले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा सोमवारी दि. १४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.