यावल तालुक्यातील अंजाळे येथील घटना ; जागरणाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या अमळनेर, सोयगावहून…
यावल (प्रतिनिधी) : तापी नदीपात्रात बुडणाऱ्या बालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आई व मावशी यांच्यासह तिन्ही जण बुडून मरण पावल्याची हृदयद्रावक व दुर्दैवी घटना यावल तालुक्यातील अंजाळे येथे सोमवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. गावातील जागरण गोंधळ कार्यक्रमाकरिता ते नातेवाईकांकडे अंजाळे येथे आले होते. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे. यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील अंजाळे येथील घाणेकर नगरात बादल लहू भील (वय २३ वर्ष) हा युवक रहात असून तो जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करतो. खंडोबाचा जागरणाचा काल गोंधळाचा कार्यक्रम असल्याने त्यानिमित्त त्यांच्या बहिणींसह नातेवाईक घरी आलेले होते.(केसीएन)त्यात त्यांची मावस बहिण वैशाली सतीश भील (रा. अंतुर्ली, ता. अमळनेर) आणि मामे बहिण सपना गोपाळ सोनवणे (रा. पळाशी, ता. सोयगाव) याही आलेल्या होत्या. जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर सोमवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ते तापी नदीवर आंघोळीसह कपडे धुण्यासाठी गेले.
यावेळी वैशाली सतीश भील यांचा मुलगा नकुल (वय ५ वर्षे) हा खेळताना अचानक पाय घसरून पाण्यात पडल्याने गटांगळ्या खाऊन बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याची आई वैशाली भील आणि मावशी सपना सोनवणे या दोघींनी पाण्यात उडी मारली.(केसीएन)मात्र दुर्दैवाने या दोन्ही बहिणींना पोहता येत नसल्याने हे तिन्ही जण पाण्यात बुडाले. दरम्यान, यांच्यासोबत नदीवर गेलेल्या अनु सतीश भील या बालिकेने घरी धावत येऊन याची माहिती दिली. यानंतर पोहणाऱ्यांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढले. मात्र तो पर्यंत फारच उशीर झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेत अंतुर्ली ता. अमळनेर येथील वैशाली सतीश भील व त्यांचा पाच वर्षाचा मुलगा नकुल तसेच पळाशी येथील सपना गोपाळ सोनवणे या तिघांचा मृत्यू झाला. तिघांच्या मृत्यूमुळे अंजाळे गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.