तज्ञ डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे दोन बालकांना नवजीवन
जळगाव – डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दोन बालकांवर यशस्वीपणे ‘डिव्हाइस क्लोजर’ ही हृदय शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. सात महिन्यांचा बालक आणि चार वर्षाचा दुसरा बालक यांना जन्मतः हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले होते. या दोन्ही बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना नवजीवन मिळाले आहे.
याबाबत माहिती अशी की, धरणगाव येथील देवांश निकम (वय ४ वर्षे) आणि मुजामिल शेख (वय ७ महिने रा. यावल) या दोन्ही बालकांना जन्मत:च हृदयात छिद्र होते. त्यामुळे त्यांना सतत धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या त्रासदायक लक्षणांचा सामना करावा लागत होता. अशा परीस्थितीत त्यांच्या कुटूंबियांनी त्यांना जळगाव येथे दाखविले असता बालकांना डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात भरती करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार ह्या दोन्ही बालकांना डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या हृदयालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. बालकांमधील लक्षणांची गंभीरता ओळखून रुग्णालयात करण्यात आलेल्या २ डि इको तपासणीत त्यांच्या हृदयात छिद्र असल्याचे स्पष्ट झाले. अशा स्थितीत वेळेवर उपचार न मिळाल्यास हृदयावर अधिक ताण येऊन अधिक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्वरीत उपाययोजना करत डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाने विशेष प्रयत्न करत विभागप्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील बाल हृदयरोग तज्ञ डॉ. श्रीपाल जैन यांनी हृदयालयातील टीमच्या मदतीने शस्त्रक्रिया करून हृदयाचे छिद्र बुजविले. या शस्त्रक्रियेला डिव्हाइस क्लोजर असे म्हणतात.
डिव्हाइस क्लोजर म्हणजे काय?
ही एक अत्याधुनिक व कमी आक्रमक पद्धत आहे, ज्यामध्ये उघड्या हृदयाच्या शस्त्रक्रियेची गरज न पडता हृदयातील छिद्र बंद करण्यासाठी एक खास उपकरण शिरामार्गे हृदयात पोहोचवले जाते. या पद्धतीमुळे रूग्णाचे त्रास कमी होतो आणि लवकर बरे होण्यास मदत मिळते.
बालकांना योजनेचा लाभ
या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च लागतो. रूग्णालयात भरती झालेल्या बालकांच्या पालकांची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने त्यांना डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. या योजनेतंर्गत शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. दोन्ही बालक आता पूर्णपणे ठणठणीत आहेत . या शस्त्रक्रियेत डॉ. धवलकुमार, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. ललितकुमार, तंत्रज्ञ सुधाकर बिराजदार आणि नर्सिंग विभागाने सामुहिक सहभाग घेतला.
ग्रामीण व उपनगरातील रुग्णांनाही अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ही शस्त्रक्रिया हे याचे उत्तम उदाहरण आहे. दोन्ही बालकांचे जीवन वाचवता आल्याचा आम्हाला खूप आनंद आहे.या यशामुळे पालकांच्या चेहर्यावर आनंदाचे अश्रू उमटले आहे.
– डॉ. वैभव पाटील, विभागप्रमुख, हृदयालय.