नागरिकांनी काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहराने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा उच्चांक गाठला असून मंगळवारी केंद्रीय जल आयोग कार्यालयात कमाल ४५.८ अंशावर तापमान नोंदविण्यात आले. ढगाळ वातावरण निवळल्यानंतर सूर्य पुन्हा आग ओकू लागला आहे.
भुसावळात एकाच दिवसात ०.६ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली. तापमानात सतत वाढ होत आहे. रविवार ६ एप्रिल रोजी ४४.३, सोमवार ७ एप्रिल रोजी ४५.२ तर मंगळवारी ८ एप्रिल रोजी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक ४५.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. सोमवार ७ एप्रिल रोजी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची (४५.२ अंश सेल्सिअस) नोंद झाली होती. एकाच दिवसात हा उच्चांक मोडला असून मंगळवारी ४५.८ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. नागरिकांनी उन्हापासून स्वतःची काळजी घ्यावी. गरज नसेल तर घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडल्यास पांढऱ्या व सुती कपड्यांचा वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.









