डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांच्या टीमकडून यशस्वी उपचार
जळगाव : ३५ वर्षीय तरूणाला गत १८ वर्षांपासून स्किझोफ्रेनियाचा आजार जडला होता. मात्र डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मानसोपचार विभागातील तज्ज्ञांच्या टीमने केलेल्या उपचाराला यश आल्याने तरूणाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
याबाबत माहिती अशी की, ३५ वर्षीय महेश नामक तरूण हा अभ्यासात प्रचंड हुशार होता. दहावीत असतांना तो डिप्रेशनमध्ये गेला. तेव्हापासून त्याला मानसिक विकार जडला. मानसिक तणाव वाढत गेला आणि त्याचा स्वभाव बदलू लागला. मागील काही दिवसात त्याच्या वागण्यात मोठा बदल दिसू लागला. तो हिंसक झाला. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले.
मानसोपचार तज्ञांचे यशस्वी प्रयत्न रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आदित्य जैन, डॉ. सौरभ भूतांगे, डॉ. उमा चांदूरकर, डॉ. हिमांशू जाधव, डॉ. देवांश गणात्रा, डॉ. रूचिता आटे या तज्ज्ञांच्या टीमने विविध चाचण्या करून त्याला स्किझोफ्रेनिया असल्याचे निदान केले. या विकारावर प्रभावी उपचार करण्यासाठी ईसीटी (इलेक्ट्रो-कन्व्हल्सिव्ह थेरपी) उपचार पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
ईसीटी थेरपीचा सकारात्मक परिणाम
ईसीटी थेरपीच्या मदतीने त्याचे मानसिक संतुलन सुधारले आणि काही दिवसांतच तो सामान्य वागू लागला. शारीरिक व मानसिक स्थिती सुधारल्यानंतर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याला समुपदेशनही दिले गेले.
रुग्ण प्रकृती ठणठणीत, पालकांनी मानले आभार
उपचारानंतर रुग्णाची प्रकृती पूर्णपणे सुधारली असून तो आता पुन्हा आपल्या नियमित जीवनात परतला आहे. त्याच्या पालकांनी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ञ व संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानले.