अमळनेर-कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच बाजूने शेतकरी बांधवांचे हाल होत असताना आगीमुळे अमळनेरच्या जिनिंगचा प्रश्न निर्माण झाला म्हणून कापसाची खरेदी थांबायला नको यासाठी जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करून दि 3 जून पासून पारोळा येथे शासकीय खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आ.अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अमळनेरची लामा जीन 10 दिवस बंद राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी अडचणीत येऊ नये म्हणून यासंदर्भात सुरवातीला माजी आ.स्मिता वाघ व मार्केट सभापती प्रफुल पाटील यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचे आमदारांनी सांगितले.तसेच पारोळ्याचे आ चिमणराव पाटील व पारोळा मार्केटचे सभापती अमोल पाटील यांचे देखील या कापूस खरेदीसाठी मोलाचे सहकार्य लाभणार असल्याची माहिती आमदारांनी दिली.दरम्यान खरेदीसाठी शेतकरी बांधवाना टोकन कुठे वाटप करायचे याचा निर्णय तहसीलदार मिलिंद वाघ,सहायक निबंधक गुलाबराव पाटील,अमळनेर बाजार समितीचे सभापती व संचालक बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेतील.व सर्वांच्या उपस्थितीतच टोकन वाटप होईल याबाबत सहायक निबंधकांनी आज सोमवारी अधिकृत पत्र काढले असून दि 2 पासून टोकन वाटप होऊ शकेल.बुधवार पासून 50 वाहने पारोळा येथे पाठविले जातील,अमळनेर तालुक्यातील अजून 30 टक्के शेतकऱ्यांचा कापूस शिलक असून टोकन प्रमाणे प्रत्येक शेतकरी बांधवांचा कापूस खरेदी केलाच जाईल तरी शेतकरी बांधवांनी निर्धास्त राहावे, असे आवाहन आ अनिल पाटील यांनी यावेळी केले.