चोपडा तालुक्यातील धानोरा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील धानोरा येथे शेतात गुरांसाठी चारा घेण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याला घरी परतताना विद्युत वायरला स्पर्श झाल्यामुळे त्याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
अनिल भिला कोळी (वय २७, रा.धानोरा ता.चोपडा) तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. तो आई, पत्नी, एक मुलगा, भाऊ यांचेसह राहत होता. शेती काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)दरम्यान, शुक्रवारी जनावरांसाठी चारा घेण्याकरिता शेतामध्ये गेला होता. त्याच्यासोबत एक लहान बालक होता. चारा डोक्यावर घेऊन घरी परतत असताना विद्युत वायरचा त्याला स्पर्श झाल्याने, त्याच्या अंगात विद्युत प्रवाह शिरल्याने त्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.
ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ शेताकडे धाव घेतली. अनिल कोळी याला तातडीने धानोरा उपकेंद्र व तेथून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.(केसीएन)या वेळेला अनिल कोळी यांच्या कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. रुग्णालयात धानोरा ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे धानोरा गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद घेण्याचे काम सुरू होते.