चाळीसगाव तालुक्यात कन्नड घाटाखाली अपघात
चाळीसगाव (प्रतिनिधी) : श्रीरामपूरहून नवस फेडून छत्रपती संभाजीनगरमार्गे पुन्हा चाळीसगावकडे परत येत असताना २० प्रवाशांनी भरलेली पिकअप गाडी कन्नड घाटाच्या पायथ्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने संरक्षण कठड्याला धडकली. या भीषण अपघातात तीनजण जागीच ठार झाले तर ५ जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात बुधवारी रात्री ८ वाजता घडला. चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल पवार यांनी अन्य कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
पातोंडा येथील रहिवासी अतुल माळी यांच्या मुलीचा नवस फेडण्यासाठी बुधवारी सकाळी ४ वाजता (एमएच१९/बीएम ३९४७) या वाहनाने माळी कुटूंबातील २० जण श्रीरामपूर येथे गेले होते.(केसीएन)नवस फेडण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हे सर्वजण पुन्हा याच वाहनातून छत्रपती संभाजीनगरमार्गे चाळीसगावकडे येत होते. या अपघातात सारजाबाई मधुकर माळी (६५, पातोंडा), नाना दामू माळी (पातोंडा), राहुल लक्ष्मण महाजन (गुढे, ता. भडगाव) हे तिघे जागीच ठार झाले. राजेंद्र भिमराव माळी (४२), अनिकेत रमेश माळी (१७), गौरव धर्मा माळी (१७), भिमराव भगवान माळी (३८), नाना संतोष माळी (३२), सुनीता रमेश माळी (३८, सर्व पातोंडा), संदीप संपत माळी, हरचंद पवार, निंबा काळू महाजन (६०, सर्व पोहरे) हे जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कन्नड घाटाच्या पायथ्याशी गाडी आली असता चालकाने वळण घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वळणाचा अंदाज चुकला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन संरक्षण कठड्याला धडकले. एकूण २० जण या बसमधून प्रवास करत होते. घरगुती कार्यक्रमासाठी हे सारेजण श्रीरामपूर येथे गेले होते. परतीच्या वाटेवर असतानाच हा अपघात झाला. वाहनाचेही मोठे नुकसान झाले. जखमींना तातडीने उपचारार्थ ग्रामीण व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.